सांगली :- सावधान! ख्रिस्ती धर्म स्वीकारून 'हिंदु मांग' जातीचे प्रमाणपत्र वापरणाऱ्यांची आता खैर नाही.
सांगली:- ख्रिस्ती पंथाचा स्वीकार करूनही केवळ शासकीय सवलती हडपण्यासाठी 'हिंदु मांग' (अनुसूचित जाती) असल्याचा बनाव रचणार्या सांगलीतील आकाश तिवडे आणि प्रकाश तिवडे या दोघांच्या विरोधात 'सकल हिंदु समाज' आणि 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान' यांनी रणशिंग फुंकले आहे. 'धर्मांतर करून मूळ धर्माशी प्रतारणा करायची आणि पुन्हा हिंदूंच्या हक्कांवर डल्ला मारायचा, हा दुटप्पीपणा आता सहन केला जाणार नाही', अशी ठाम भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी घेतली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जात पडताळणी समिती आणि विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शासनाने यावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिमन्यू भोसले, अमोल सदामते, अनिल सदामते, प्रमोद मोरे, अक्षय भोसले, दादा कांबळे यांसह अन्य धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सांगली येथील शांतीनगर परिसरात रहाणारे आकाश राजू तिवडे आणि प्रकाश राजू तिवडे या दोघांनी ख्रिस्ती पंथात धर्मांतर केले. असे असूनही त्यांनी स्वतःला 'हिंदु मांग' दर्शवून अनुसूचित जातीचे जातप्रमाणपत्र वापरले आणि त्याद्वारे विविध शासकीय लाभ घेतले. या संदर्भातील सबळ पुरावे, छायाचित्रे आणि चित्रफिती (व्हिडिओ) प्रशासनाला सादर करण्यात आल्या आहेत.
'द कॉन्स्टिट्यूशन (शेड्युल कास्ट) ऑर्डर १९५०' नुसार अनुसूचित जातीचा लाभ केवळ हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मीय यांनाच मिळतो. धर्मांतरितांना हा लाभ घेणे घटनाबाह्य आहे. या दोघांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ४२० (फसवणूक), ४६८ आणि ४७१ अन्वये तातडीने गुन्हे नोंदवावेत. त्यांचे जातप्रमाणपत्र रहित करून त्यांनी आजवर घेतलेले सर्व शासकीय लाभ व्याजासह वसूल करावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.