"तुकाराम मुंढेंची २४ वी बदली की राजकीय कोंडी? नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावरून मंत्र्यांचा 'कडक' शिस्तीला विरोध!"
मुंबई : तडफदार व 'मिस्टर क्लीन' अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या तुकाराम मुंढे यांची मागच्या आठवड्यात करण्यात आलेली बदली ते नव्या ठिकाणी रुजू होण्यापूर्वी आश्चर्यकारकरित्या अंधातरी ठेवण्यात आली आहे. परिणामी, मुंढे पदाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंढे यांना नव्या ठिकाणी रुजू होवू न देण्यास नाशिक कुंभमेळ्याच्या प्रस्तावित कामांच्या आर्थिक उलाढालीची किनार असल्याची चर्चा रंगली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने भारतीय प्रशासन सेवेतील १० अधिकाऱ्यांच्या ३१ जानेवारी रोजी बदल्या केल्या. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांना 'दिव्यांग सक्षमीकरण विभागा'च्या सचिव पदावरुन हटवून 'आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागा'चे सचिवपद दिले होते. 'आपत्ती व्यवस्थापन विभागा'च्या प्रधान सचिव पदावरुन हटवून विनिता वैद सिंगल यांना 'मृद व जल संधारण विभागा'च्या प्रधान सचिवपदी नियुक्ती दिली गेली. तर मुंढे सचिव असलेल्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिवपदी माणिक गुरसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती.तुकाराम मुंढे यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागात सप्टेंबर २०२५ मध्ये आणले होते. आताच्या बदली वेळी मुंढे हे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक म्हणून गेले होते. दरम्यान मुंढे यांच्या आईचे पुण्यात निधन झाल्याने ते राज्यात परतले. या काळात त्यांना प्रतिक्षेत ठेवण्याच्या नाट्यमय घडामोडी घडल्या. मुंढे २००५ च्या तुकडीचे 'आयएएस' आहेत. त्यांची आजपर्यंत २४ वेळा बदली झाली. तुकाराम मुंढे यांना जो आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग देण्यात आला होता, त्याचे मंत्री गिरीश महाजन असून ते सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत.
तुकाराम मुंढे यांना आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागात रुजू होऊ न दिल्याने अनेक समीकरणे बदलली. विनीता वैद सिंगल यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग कायम ठेवण्यात आला. त्यामुळे सिंगल यांना नव्याने दिलेले मृद व जलसंधारण विभागाचे सचिवपद रिक्त राहिले. मात्र तेथेही मुंढे यांना नियुक्ती न देता दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिवपद दिलेल्या माणिक गुरसाळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे यांची भीती का?
तुकाराम मुंढे यांना आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवपदी देण्यास सत्ताधारी गोटातून विरोध झाला. कारण नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी केंद्रातून हजारो कोटी निधी येणार आहे. कुंभमेळ्याची कामे आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार आहे. मुंढे हे नियमावर बोट ठेवणारे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना इतरत्र पाठवावे, असा कुंभमेळ्याशी संबंधीत राजकीय नेतृत्वाचा आग्रह होता. त्यातून मुंढे यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.