संसदेचे विशेष अधिवेशन संपताच आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील सात खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला… शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली… उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी त्यांच्याच पक्षातील एक नेता प्रयत्नशील असल्याचा खळबळजनक दावा, भाजपाच्या प्रवक्त्याने केला… मराठा समाजात भांडण लावण्यासाठीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीचे अध्यक्ष केले का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला… पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपा नेमक्या किती जागा जिंकणार, याबाबतचा आकडाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितला. आज दिवसभरात घडलेल्या या राजकीय घडामोडींचा हा सविस्तर आढावा…
भाजपात ७ खासदारांचा प्रवेश
संसदेचे विशेष अधिवेशन संपताच दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य व राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, त्यांनी ‘आप’मधील दोन-तृतीयांश राज्यसभा खासदारांसोबत भाजपामध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये क्रिकेटर हरभजनसिंग, संदीप पाठक यांच्यासह ७ खासदारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही भाजपात सामील होत असल्याचे खासदार राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले. राज्यसभेचे सात खासदार एकाचवेळी फुटल्यानंतर आम आदमी पार्टीने यावर प्रतिक्रिया दिली. या सातही खासदारांनी ‘आप’सह देशातील जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही. प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने देशभरात ऑपरेशन लोटस सुरू केले, असा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपा प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी त्यांच्याच पक्षातील एक नेता प्रयत्नशील असल्याचा खळबळजनक दावा, भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेतून केला. विधान परिषदेची जागा उबाठाला हवी असेल तर राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी लागेल, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे विधान परिषदेवर गेले तर वर्षभरानंतर राज्यसभा निवडणुकीत आपला पत्ता कट होऊ शकतो म्हणून आपल्या खासदारकीची चिंता लागलेले संजय राऊत हे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही ते म्हणाले. माझी मागणी आहे की, संजय राऊत यांना काँग्रेसरत्न पुरस्कार देण्यात यावा. कारण- राहुल गांधी जेवढी काँग्रेसची बाजू मांडत नाहीत, त्यापेक्षा जास्त चांगली बाजू संजय राऊत मांडतात. काँग्रेसची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जात आहे. मीठ उद्धव ठाकरे यांचे खायचे आणि चाकरी काँग्रेसची करायची हा त्यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत यांच्यामुळे काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील, असा टोलाही बन यांनी लगावला. त्यांच्या या टीकेवर राऊत काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शिंदेंच्या शिलेदाराचे पाय खोलात?
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत "तुझाही गोविंद पानसरे करतो" अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवालही त्यांनी पत्रातून उपस्थित केला. त्यांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा संताप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या उपसमितीवर संताप व्यक्त केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखा खमक्या माणूस मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाला तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. ते मराठा समाजाचे नुकसान होऊ देणार नाहीत, हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करतील, असा आम्हाला विश्वास होता. पण विखे पाटील नेमके उलट वागायला लागले आहेत, असे जरांगे म्हणाले. शिंदे समितीची मुदत संपली, पण या समितीला मुदतवाढ देण्याची आठवण उपसमितीला नाही. ही उपसमिती फक्त मराठा समाजामध्ये भांडण लावण्यासाठी आहे का? मराठवाड्यातील अभ्यासक आणि आमच्या अनेक समन्वयकांनी उपसमितीची बैठक घ्या, अशी मागणी विखे पाटलांकडे केली, पण ते आमची बैठक घेत नाही आणि काही विकृत लोकांना निमंत्रित म्हणून बोलावून त्यांच्याशी चर्चा करतात, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपाला विखे पाटील काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोणाचे सरकार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. या मतदानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद केली. यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, भाजपा पहिल्या टप्प्यात १५२ पैकी ११० जिंकणार आहे, असा दावा अमित शाह यांनी केला. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांचे सरकार जाणार असून भाजपा सरकार येणार, असेही ते म्हणाले. मतदानाची ही टक्केवारी उत्साह वाढवणारी आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जे काम केले, त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. आम्ही राज्यातील जनतेला परिवर्तनाचे आवाहन केले आहे. घुसखोरी मुक्त बंगाल, पायाभूत सुविधांची निर्मिती, कायद्याचे राज्य हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही शाह यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.