Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! "संघाला एक मुलगा हवाच", बागेश्वर बाबांचे वादग्रस्त आवाहन; नागपुरात शिवरायांच्या नावाचा वापर करत केला अजब दावा!

धक्कादायक! "संघाला एक मुलगा हवाच", बागेश्वर बाबांचे वादग्रस्त आवाहन; नागपुरात शिवरायांच्या नावाचा वापर करत केला अजब दावा!


आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता नागपुरात एक नवे विधान करुन राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.

जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात श्री आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारे प्रस्तावित 'भारतदुर्गा शक्ती स्थळ' या मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांनी प्रत्येकी चार मुले जन्माला घालावीत आणि त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करावा, असे आवाहन केले. त्यांच्या या विधानामुळे लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरुन आणि धार्मिक ध्रुवीकरणावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीबाबत एक दावा केला, ज्यावरुन महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू शकतात. शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार, सततच्या युद्धांमुळे छत्रपती शिवाजी महाराज एकदा थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. महाराजांनी आपले मुकुट आणि सत्ता समर्थांच्या चरणी अर्पण करुन युद्ध सोडण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र, समर्थ रामदास स्वामींनी शिष्याचे कर्तव्य आठवून देत त्यांना पुन्हा सत्ता सांभाळण्याची आज्ञा दिली, असा दावा शास्त्री यांनी केला. इतिहासातील या संदर्भावरुन यापूर्वीही महाराष्ट्रात मोठे वाद झाले आहेत, त्यामुळे शास्त्रींच्या या विधानामुळे मराठा संघटना आणि इतिहासप्रेमींमधून संताप व्यक्त होण्याची चिन्हे आहेत.

भारताच्या  सांस्कृतिक श्रेष्ठतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, जगभरात कुठेही 'पाकिस्तान माता' किंवा 'चीन माता' असे म्हटले जात नाही, केवळ भारतातच 'भारत माता की जय' असा जयघोष केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये महिलांना केवळ उपभोगाची वस्तू मानले जाते, परंतु भारतात त्यांना पूजनीय स्थान दिले जाते, असेही ते म्हणाले. भारत हा शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही आधारावर चालणारा देश आहे, हे 'भारतदुर्गा' मंदिरामुळे जगाला समजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित असलेल्या गोविंददेव गिरी महाराज यांनी नाशिकमधील अलीकडच्या 'कॉर्पोरेट' घटनेवर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ज्यांना अशा घटना ऐकून राग येत नाही, त्यांनी स्वतःला जिवंत समजावे की मृत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सामर्थ्यशाली होणे गरजेचे असून, वाईट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वीच धीरेंद्र शास्त्रींना आव्हान दिले असताना, आता या नव्या विधानांमुळे नागपुरातील वातावरण अधिकच तापले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.