Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका 'स्पेलिंग'ने फोडला ३५ कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड; आयुक्तांच्या बनावट सहीने कुंभमेळ्यात मोठा घोळ!

एका 'स्पेलिंग'ने फोडला ३५ कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड; आयुक्तांच्या बनावट सहीने कुंभमेळ्यात मोठा घोळ!


नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असल्याने सध्या कामांची लगीनघाई सुरु आहे. असे असताना नाशिकचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण बसविणे, कार्यान्वित करणे व देखभालीच्या कामांच्या कार्यादेशावर नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरुन त्र्यंबकेश्वर-कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने तब्बल ३५ कोटींच्या कामांची थेट वर्कऑर्डर काढण्यात आली होती.


हा कार्यादेश 'इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे' या संस्थेच्या नावे तयार करण्यात आला होता. परंतु आयुक्त गेडाम यांनी आपली बनावट सही ओळखली आणि हा धक्कादायक घोळ उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पडद्यामागचा सूत्रधार कोण हे स्पष्ट होणार असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे स्वीय सहायक विजय गोरख सोनवणे (रा. गंगापूर रोड) यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फियार्दीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नावाचा व्यक्ती नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आला. त्याने दोन संशयास्पद पत्रांच्या वैधतेबाबत विचारणा केली. ही पत्रे त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे गजानन पाटील-चव्हाण यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान, कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांना पत्रातील मजकूर, मार्जिन आणि स्वाक्षरीबाबत संशय आला. त्यामुळे सदरची पत्रे त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांना दाखविली.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्या पत्रांची बारकाईने पाहाणी केली. तेव्हा त्यांच्या इंग्रजीतील नावातील अक्षरांतील चुकीमुळे कार्यादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आयुक्त गेडाम यांच्या अधिकृत डिजिटल स्वाक्षरीत 'Praveen' असे स्पेलिंग असताना बनावट पत्रांवर 'Pravin' असे स्पेलिंग होते. ही बाब डॉ. गेडाम यांच्या नजरेने हेरली ही सही आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अज्ञात संशयितांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगांने बनावट कार्यादेश तयार करीत शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.