Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विट्यात खळबळ: पत्नीची हत्या करून पती फरार

विट्यात खळबळ: पत्नीची हत्या करून पती फरार


विट्यातील नेवरी रोड येथे चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी रॉड घालून महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत महिलेच्या पतीने हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित पतीचा शोध सुरु असल्याचे एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
काजल अविनाश लोटके (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. अविनाश लोटके (वय २७) असे संशयित पतीचे नाव आहे. काजल ही मूळची मुंबई येथील आहे. तर अविनाश विट्याचा आहे. काही महिन्यांपूर्वी अविनाश आणि काजल यांचा प्रेम विवाह झाला होता. अविनाश हा विट्यातील एका गॅस एजन्सीत काम करत होता.

लग्नानंतर दोघेही विट्यातील नेवरी रोड परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. अविनाश काजलवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघेही विभक्त राहत होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची समजूत घातल्याने दोघेही विट्यातील भाड्याच्या घरात एकत्र राहत होते.
मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी आत पाहिले असता काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. याची माहिती मिळताच विटा पोलिसांसह एलसीबीचे पथक घटनास्थळी धावले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. काजलचा खून केल्यानंतर अविनाश पसार झाला आहे. याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. एलसीबी आणि विटा पोलिसांचे पथक संशयित पती अविनाशचा शोध घेत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.