राज्यातील शिक्षण व्यवस्थेत सध्या गंभीर विसंगती समोर येत आहे. एका बाजूला शेकडो शाळा अत्यल्प पटसंख्येसह सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या तुलनेने अधिक आहे. या 'कमी विद्यार्थी आणि अधिक शिक्षक' या परिस्थितीमुळे अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील तब्बल 30 हजार शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट ओढावले आहे.
राज्यात सध्या एकूण 1 लाख 8 हजार 35 शाळांमध्ये सुमारे 7 लाख 46 हजार 377 शिक्षक कार्यरत असून 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वरकरणी ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली, तरी प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील शिक्षकांना 'अतिरिक्त' ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.यासोबतच 'पटपडताळणी' मोहीम सध्या सुरू असून ती 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे समायोजन होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, सुमारे 80 हजार शिक्षकांचे समायोजन होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण शाळांवर मोठा परिणाम
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. कुटुंब नियोजन, स्थलांतर आणि शहरांकडे वाढती ओढ यामुळे अनेक गावांतील शाळा रिकाम्या होत आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना शहरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवत असल्याने ग्रामीण शाळांची पटसंख्या घटत चालली आहे.
आकडेवारी काय सांगते?
राज्यात 1 ते 10 विद्यार्थी असलेल्या तब्बल 7,769 शाळा आहेत, ज्यामध्ये 12,717 शिक्षक कार्यरत आहेत. तसेच 11 ते 20 विद्यार्थी असलेल्या 11,107 शाळांमध्ये 21,740 शिक्षक आहेत. 21 ते 30 विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या 12,507 शाळांमध्ये 26,697 शिक्षक कार्यरत आहेत. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या असमतोल आहे.
प्रशासनाची भूमिका आणि पुढील दिशा
शिक्षण विभागाकडून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून संसाधनांचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर अनिश्चिततेचे सावट आले आहे. तसेच, कमी पटसंख्येच्या शाळा बंद होण्याची किंवा समूह शाळांमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेली ही विसंगती केवळ शिक्षकांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीही चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे या प्रश्नावर संतुलित आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे कुटुंब नियोजनामुळे कुटुंबात एक किंवा दोन शिकणारी मुले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले पालक शहराकडे स्थलांतरित झाले किंवा त्यांची मुले शहरांत शिकत आहेत. यातून ग्रामीण शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या राखण्यात येणाऱ्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे असे मत मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केले.
पहिली ते पाचवीचे वर्ग असताना दोन शिक्षक असण्यात चुकीचे काय? कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक आहेत म्हणजे खूपच शिक्षक आहेत ही भूमिकाच चुकीची आहे.सहावी ते आठवीची पटसंख्या 20 पर्यंत असल्यास नवीन संचमान्यता धोरणानुसार गणित-विज्ञान विषय पदवीधर शिक्षकाचे एकच पद, उर्वरित तीनही भाषा आणि समाजशास्त्र याकरिता एकच शिक्षक हे कसे? सर्वच विषय एकाच शिक्षकाने शिकविण्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे शक्य तरी आहे का? असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.