कठोर पाऊल! बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन निश्चित; पालिका आयुक्तांचा दणका
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणाची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. लग्नाचे अमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्यावर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणावर कडक भूमिका घेत, ४८ तासांच्या अटकेनंतर नियमानुसार शुक्ला यांना निलंबित केले जाईल, असे जाहीर केले आहे.
नेमके प्रकरण काय?
अंधेरी पूर्व येथील 'के-पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या नितीन शुक्ला यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक आरोप आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, विक्रोळीच्या पार्क साईट पोलिसांनी रविवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी शुक्ला यांच्या मुसक्या आवळल्या.
प्रशासनाचा इशारा:
शुक्ला यांच्या अटकेनंतर पालिकेच्या प्रतिमेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे. एका पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले की,"प्रशासनात अशा प्रकारची कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अटकेच्या ४८ तासांनंतर संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणे हा नियमाचा भाग आहे आणि त्यानुसार तातडीने अंमलबजावणी केली जाईल."या कारवाईमुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.