Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; "कोणाची तरी वाट लावण्यासाठीच हे उद्योग..."

अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; "कोणाची तरी वाट लावण्यासाठीच हे उद्योग..."


मुंबई : राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात  प्रकरणावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एकीकडे ह्या प्रकरणात अशोक खरात वगळता इतर कोणालाही अटक नसल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तसेच, खरातप्रकरणी राजकीय नेत्यांना एसआयटी (SIT) चौकशीसाठी कधी बोलवणार असाही सवाल केला जात आहे. तर, हे प्रकरण तीन महिन्यांपूर्वीच गृह खात्याला माहिती होतं असे काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. आता, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही खरातप्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले असून परखडपणे आपलं मत मांडलं आहे.
पत्रकार काय भोगत असतो हे समजलं पाहिजे, आपल्याकडे भोगणे याला वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. अरुण गुजराती यांच्यासोबत मी पहिल्यांदा बसलो, या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवे. या महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा ठेवणारे नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता थेट काही उद्योगपतींवर निशाणा साधला.

व्यंगचित्रासंदर्भाातील कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अनेक पत्रकार त्रास सहन करत आहेत, अनेक बंधन आहेत. मला आताच्या पत्रकार मुला मुलीचं वाईट वाटतं. कारण, ऑफिस म्हणत काहीतरी घेऊन या, काय घेऊन या? कांदे चालतील? नाही. मग काय हे असे बोलले ते तसे बोलले झुंजवा. मग, प्रकरण आई बहिणींपर्यंत जातं, असे म्हणत राज ठाकरेंनी बातम्यांबाबत मत मांडलं. कोणतरी आला खरात. शेताला पाणी मिळत नाही पण खरातला पाणी मिळत. ही प्रकरण पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवलेली बाहेर काढतात, असे म्हणत राज ठाकरेंनी खरात प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया जाहीर कार्यक्रमातून दिली. तसेच, लोक सुधारतील अशी अपेक्षा आणि मला पुन्हा व्यंगचित्र काढायची संधी मिळेल, असेही राज यांनी यावेळी म्हटले.

पत्रकारांवर निशाणा, जुन्या आठवणींना उजाळा

व्यंगचित्र काढून खूप प्रयत्न केले पण लोक काही सुधारले नाही, जे चित्रातून होत नाही ते आमच्या भाषणातून होतं. सध्या, राजकीय लोकांनी ट्रोलर बसवलेले असतात. माझी इच्छा होती वर्तमानपत्र काढायची पण बरं झालं मी नाही काढला. कारण, सध्या सगळी जाहिरातीवर चालतात आणि त्यासाठी काय काय करतात ते मला करावे लागलं असत, अशी मिश्कील टिपण्णी राज ठाकरे यांनी केली. पत्रकार माझ्या घरातच होते, मी बघत आलो. अत्रेंसारखी पत्रकारिता आज शक्य नाही, अत्रे हे एक व्यक्ती नव्हती. रावण विद्वान होता, 10 तोंड म्हणजे विद्वतेची दहा तोंडे होती. 

अत्रे पण रावणासारखे 10 तोंडांसारखे विद्वान. त्यांची अनेक अंग होती, मला खंत आहे की मी त्यांना पाहू शकलो नाही. आजच्या पत्रकारितेला अनेक पदर आहेत. ते पदर उघडले तर सगळे नागडे होतील. चांगल्या पत्रकारांचा हकनाक बळी जात आहे. मी नागपूरला गेलो होतो अधिवेशन कालावधीत, मला तेव्हा एकनाथ शिंदे यांचा फोन आला, बोलले या विधानभवनात. मी गेलो तिथं अनेक पत्रकार भेटले, मी त्यांना विचारलं की आता कुठे आहेस. असे अनेक पत्रकार मला भेटले की ते मंत्र्यांकडे कामाला आहेत. काय यांच्याकडून अपेक्षा करायची, जे स्वतः विकले आहेत त्यांच्या मतांना काय किंमत द्यायची. मी तर मेलेला कोंबडा आहे, ज्याला आगीची भीती नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांची व्यथाच मांडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.