Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'काळाचा क्रूर घाला':,शाळेचे गेट कोसळून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; मृत मुलगी मुख्याध्यापिकेचीच कन्या.

'काळाचा क्रूर घाला':,शाळेचे गेट कोसळून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; मृत मुलगी मुख्याध्यापिकेचीच कन्या.


गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा शहर शनिवारी एका अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हादरले. नगर परिषद तिरोडा संचलित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला येथे शाळेच्या जर्जर मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट अचानक कोसळल्याने अवघ्या अकरा वर्षांच्या निराली मनीष चाफले या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून निष्काळजीपणाबाबत संतापाची लाट उसळली आहे.

शनिवारी (११ एप्रिल) दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे विद्यार्थी घरी जाण्यासाठी बाहेर पडत होते. त्या वेळी शाळेचे मुख्य गेट, जे बऱ्याच काळापासून जीर्ण, जर्जर आणि धोकादायक अवस्थेत होते, अचानक कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, निरालीने गेटला हात लावताच ते तिच्यावर कोसळले आणि ती त्याखाली दबली.

हा प्रसंग इतका आकस्मिक होता की उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना काही कळण्याच्या आत सर्व काही घडून गेले. घटनेनंतर तातडीने निरालीला तिरोड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला गोंदियाकडे हलविण्यात येत असताना, दुर्दैवाने वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
निराली ही केवळ एक विद्यार्थिनी नव्हती, तर उज्ज्वल भवितव्याची आशा असलेली, अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू मुलगी होती. राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत तिने राज्यात चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले होते. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तिचा सन्मान करण्यात आला होता. तिच्या या यशामुळे शाळा आणि परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा आणखी एक हृदयस्पर्शी पैलू म्हणजे निरालीची आई, शुभांगी चौधरी चाफले, या त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या या अनर्थामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या असून, संपूर्ण शिक्षकवर्गही शोकमग्न आहे.

संबंधित यंत्रणांनी कधी जागे होणार
शाळेचे गेट जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आधीपासूनच होती आणि त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही प्रलंबित होता, असे समोर येत आहे. विद्यार्थ्यांना गेटपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेने केवळ एक निरागस जीव गमावला नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षिततेच्या प्रश्नालाही अधोरेखित केले आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन शाळांमधील सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.