सांगली जिल्हा परिषदेतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. कारण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा जतचे अध्यक्षपद ज्यांनी घालवल आहे, त्यांचा कार्यक्रम होणार, असं वक्तव्य केलं आहे.
शिवाय पडळकर यांनी हे वक्तव्य करताना थेट सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना इशारा दिला आहे. सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल हे माहिती नाही, पण ज्यांच्यामुळे जतचे अध्यक्षपद गेलंय, त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार. विशाल पाटील पुढे खासदार म्हणून दिसणार नाहीत. त्यासाठी मी जीवाचं रान करेन असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे.
तर पडळकरकरांच्या याच वक्तव्यावर आता खासदार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "ज्यांनी माझ्याविरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्ने पाहत असतील", असा टोला पाटील यांनी पडळकरांना लगावला आहे. तसंच जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल पण पडळकरांनी विसरू नये की त्यांचा कितीतरी वेळा पराभव झाला आहे.
जिल्ह्यातील मोठ्या लोकांच्यावर बोलून मते मिळतील हे स्वप्न धुळीस मिळेल, असंही विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ज्या ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो त्या ठिकाणी भाजप राखीव मतदारसंघ करण्याचा प्रयत्न करू शकेल. ज्या वेळी याबतबतचे चित्र स्पष्ट होईल त्यावेळी निर्णय घेऊ असेही विशाल पाटील म्हणाले.
पडळकर नेमकं काय म्हणाले?
सांगलीमधील 2029 च्या खासदारकी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल हे माहिती नाही. पण ज्यांच्यामुळे जतचे अध्यक्षपद गेलंय, त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार. लोकसभेसाठी सांगलीमध्ये राखीव असेल तरी विशाल पाटील हे पुढे खासदार म्हणून दिसणार नाहीत. त्यासाठी मी लोकांमध्ये जाईल. लोकांचे काम करेल. विशाल पाटील पुढचे खासदार नसणार त्यासाठी आपण जीवाचं रान करू आणि 2029 मध्ये सगळ्यांचा कार्यक्रम करू."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.