सांगली: 'पॅथॉलॉजिस्टशिवाय चालवलेल्या प्रयोगशाळा अवैध आहेत. जिल्ह्यात सुमारे २०० प्रयोगशाळा बेकायदेशीर आहेत. पॅथॉलॉजिस्टशिवाय चालवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा चालकांवर बनावट डॉक्टर म्हणून कारवाई करावी,' अशी मागणी पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलोजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केली. डॉ. यादव यांनी पत्रकात म्हटले आहे, की एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला गेला.
हे एक हिमनगाचे टोक आहे. जिल्ह्यात अनेक प्रयोगशाळांमध्ये पॅथॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर कार्यरत नाहीत. काही लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत सुरू असून फक्त पॅथॉलॉजिस्टचे नाव व सही रिपोर्टवर छापून दिले जातात. चुकीचे रिपोर्ट, चुकीचे निदान किंवा निदानास विलंब होणे, विनाकारण रुग्णांना जीवास मुकावे लागणे, असे प्रकार घडतात.सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार फक्त पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (पॅथॉलॉजिस्ट) प्रयोगशाळा रिपोर्ट स्वाक्षरीत करू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बनावट डॉक्टर पुनर्विलोकन समिती स्थापन करून डॉक्टरांवरील कारवाईला गती देणे, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद देणे अपेक्षित आहे.तालुक्याच्या ठिकाणी १६३ पैकी १३७ लॅबोरेटरी व महापालिका कार्यक्षेत्रामध्ये १०५ पैकी ५४ लॅबोरेटरी बेकायदेशीर आहेत. गेली ४ वर्षे या विषयाचा पाठपुरावा करूनही आरोग्य विभागाने एकाही लॅबोरेटरीवर कारवाई केलेली नाही, हे धक्कादायक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.