मिरज: मिरज शहरातील निखील विलास कलगुटगी याच्या निर्घृण खून प्रकरणातील प्रथमेश ढेरे टोळीच्या १५ सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास अपर पोलीस महासंचालक (म.रा. मुंबई) यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईमुळे मिरजेतील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गु.र.नं. ३८७/२०२५ मध्ये तपास करत असताना, टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे (वय २५) आणि त्याच्या १४ साथीदारांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी बनवल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने २०१७ पासून परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, दरोडा, विनयभंग आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच सुरू केली होती.
दोषारोपपत्राला मिळाली मंजुरी
सदर गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केला. आरोपींच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांच्यावर 'मोक्का' लावण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. १३ जानेवारी २०२६ रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.
विटा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास हाती घेतला. तपासात ठोस पुरावे मिळाल्यानंतर, १ एप्रिल २०२६ रोजी अपर पोलीस महासंचालकांकडे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. पुराव्यांची पडताळणी करून यास अंतिम मंजुरी देण्यात आली असून, आता विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
या आरोपींवर झाली कारवाई:
१) प्रथमेश सुरेश ढेरे (टोळी प्रमुख)२) विशाल बाजीराव शिरोळे३) सर्फराज बाळासो सय्यद४) प्रतीक सचिन चव्हाण५) करण लक्ष्मण बुधनाळे६) गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी७) सुरज चंदू कोरे८) संग्राम राजेश यादव९) सलीम गौस पठाण१०) चेतन सुरेश कलगुटगी११) सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी१२) महंमदशिराज उर्फ सोहेल आब्बास आगलावणे१३) अक्षय सदाशिव कांबळे१४) अमन समीर मुल्ला१५) दीप अश्विन देवडा (परागंदा)
पोलीस प्रशासनाचा इशारा
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा टोळ्यांवर यापुढेही 'मोक्का' अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
या यशस्वी कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, विपुल पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि सांगली गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.