सांगली :- 'तमाशा सोडा, पोरांना शिकवा!' बाबासाहेबांच्या त्या एका शब्दाने आरगच्या कार्यकर्त्याचे नशीबच बदलले
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी सांगली जिल्ह्याच्या अनेक आठवणी घट्टपणे जोडलेल्या असून, त्या आजही स्थानिकांच्या स्मरणात जिवंत आहेत. सांगली, मिरज आणि पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे त्यांनी दिलेल्या भेटी व केलेल्या कार्यक्रमांच्या आठवणी आजही ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितल्या जातात.
बाबासाहेबांच्या चळवळीत देशभरातील दलित समाजाचे अनेक कार्यकर्ते सक्रिय होते. मिरज तालुक्यातील आरग येथील धोंडीराम श्रावण कांबळे आणि त्यांचे बंधू गुंडू श्रावण कांबळे हे बाबासाहेबांच्या सोबत कायम सावलीसारखे राहायचे. धोंडीराम कांबळे यांच्या खांद्यावर हात ठेवून बाबासाहेब अनेकदा स्टेजवर चढउतार करत असत. त्यांच्या या सहवासातील अनेक आठवणी धोंडीराम कांबळे यांनी आयुष्यभर जपून ठेवल्या.
एकदा बाबासाहेबांनी धोंडीराम कांबळे यांना "काय करतोस?" असे विचारले असता त्यांनी 'तमाशात काम करतो' असे सांगितले. त्यावर बाबासाहेबांनी त्यांना तमाशा सोडून गावी जाऊन मुलांना शिक्षण देण्याचा आणि समाजप्रबोधनाचे कार्य करण्याचा सल्ला दिला. या मार्गदर्शनानुसार, त्यांनी गावात परत येऊन समाजकार्याला सुरुवात केली आणि बाबासाहेबांची चळवळ आरगसह सीमाभागात रुजविण्याचे काम आयुष्यभर केले.
बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर कांबळे बंधूंनी त्यांच्या अस्थी आरग येथे आणल्या. काही अस्थी पोस्टाद्वारेही आल्या होत्या. त्या ठिकाणी आज स्मारक उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या आठवणी जपल्या जात आहेत. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील यशवंत दादू लांडगे, गणपत महादू लांडगे, मारुती रामचंद्र लांडगे आणि लमा लखू लांडगे हे कार्यकर्ते मुंबईला जाऊन बाबासाहेबांच्या अस्थी घेऊन आले. त्यानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंत (भैयासाहेब) आंबेडकर, दादासाहेब रुपवते, बी. सी. कांबळे, बाबू आवळे आणि पी. टी. मधाळे यांच्या उपस्थितीत अस्थींचे पूजन करण्यात आले.
आजही आरग आणि अंकलखोप या दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी जतन करून ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणी भव्य स्मारके उभी आहेत. अस्थींच्या रूपाने बाबासाहेब या भागातील लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या सर्व आठवणींना पुन्हा उजाळा मिळत असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.