गणपती बाप्पाच्या आगमनावरून झालेल्या वादावर भाऊ कदम यांचे भाष्य; म्हणाले, "आमच्या बौद्ध बांधवांना..."
विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये भाऊ कदम यांचं नाव घेतलं जातं. 'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमांमुळे त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. आजवर त्यांनी अनेक सिनेमे आणि नाटकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
मात्र, कलाकारांच्या आयुष्यात नेहमीच चढउतार येत असतात. काही वर्षांपूर्वी असा एक प्रसंग घडला होता, जेव्हा भाऊ कदम यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यामुळे काही समाजबांधवांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. अभिनेते भाऊ कदम यांनी घरी गणपती बसवल्याने काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. यानंतर कोणाच्याही भावना दुखावू नयेत यासाठी भाऊंनी सर्वांची माफी मागितली होती. या प्रसंगाबद्दल त्यांनी सागर खापरे यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.भाऊ कदम सांगतात, "माझ्या बायकोची आणि माझी जात वेगवेगळी आहे. तिच्या घरी गणपती यायचा. तेव्हा मला कोणीतरी शाडूच्या मातीचा गणपती भेट म्हणून दिला होता. इकोफ्रेंडली मूर्ती होती…ती मी घरी घेऊन गेलो. बायकोला सुद्धा मूर्ती आवडली. त्यावेळी आमच्याकडे शूट करायला एका न्यूज चॅनेलचे लोक आले होते. त्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर आमचे जे बौद्ध बांधव आहेत, ते म्हणाले 'हे बरोबर नाही'. मी म्हटलं सॉरी मला माहीत नव्हतं… याचे एवढे पडसाद उमटतील याची मला खरंच कल्पना नव्हती. त्यावेळी मी कोणालाच काहीच उत्तर दिलं नाही."
"आपण कोणासाठी तरी आदर्श ठरतोय…मला पाहून जर कोणी मोठं होत असेल आणि हे जर त्यांना नको असेल…तर बरोबर आहे तुमचं, मी आता यापुढे तसं करणार नाही." असं भाऊंनी यावेळी सांगितलं. दरम्यान, भाऊ कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अलीकडेच ते 'प्रेमाची गोष्ट २' या सिनेमात झळकले होते. याशिवाय भाऊ सध्या 'सिरियल किलर' या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. लवकरच भाऊ कदम आणि निलेश साबळे एका सिनेमात सुद्धा एकत्र झळकणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.