Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मराठी सक्ती मागे घ्या; अन्यथा ४ मेपासून चाकं थांबणार!'

'मराठी सक्ती मागे घ्या; अन्यथा ४ मेपासून चाकं थांबणार!' 


मुंबई: राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषाप्रवीणता अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक - मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऑटो रिक्षा चालक - मालक संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रने जाहीर केले आहे की, २८ एप्रिलपर्यंत राज्य परिवहन विभागाने हा आदेश मागे घेतला नाही, तर ४ मेपासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करण्यात येतील. 
संघटनेचे अध्यक्ष शशांक शरद राव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठीच आहे. प्रवाशांशी मूलभूत संवाद साधणे पुरेसे आहे. चालक आधीच पोलिस पडताळणी, निवासी अट आणि इतर नियम पूर्ण करतात. मात्र, ॲग्रिगेटर कॅब सेवा आणि ई-बाइक टॅक्सींसाठी असे कठोर नियम लागू नाहीत. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


परिवहनमंत्र्यांना निवेदन

राज्यात १५ लाख ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारक असून, त्यापैकी २.८ लाख वाहने मुंबई महानगर क्षेत्रात आहेत. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांवर परिणाम होईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्र्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार आहे. हा २०१९चा शासनाचा निर्णय आहे. तो मागे घेण्याचा अधिकार माझ्याकडे नसून कॅबिनेटकडे आहे. चालक राज्यात जर इतकी वर्षे काम करत असतील तर त्यांना मराठी येणे आवश्यक असून, यामध्ये काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

राज्यात मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे कसे? सरनाईक यांचा सवाल
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आणि गुणगान मात्र हिंदीचे गायचे, हे योग्य नाही. इतर राज्यांत हिंदी बोलली जाते का? मग महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे कसे, असा सवाल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. लोकमान्यनगर परिसरात विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ मेपासून सुरू होणारी मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर शहरात मराठी न येणाऱ्या चालकांची छाननी सुरू असून, २९ तारखेला अहवाल मिळणार आहे. त्यानंतर ३० तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणारर असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन आणि मोर्चांबाबत बोलताना, कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केला.

'मनसे'कडून निर्णयाचे स्वागत: मनसेने या निर्णयाचे स्वागत केले असून, मीरा-भाईंदर परिसरात मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. याबाबत विचारले असता, सरनाईक म्हणाले, 'आतापर्यंत जे विरोध करत होते, तेच आता शिकवणी सुरू करत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे.' मराठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्यांना सर्वांचे समर्थन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.