Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मसाल्यात काळं आणि नखांवर पांढरं! सुनेचा भयानक कट; डॉक्टरांच्या एका चाणाक्ष नजरेने उघडलं सासूच्या मृत्यूचं गूढ

मसाल्यात काळं आणि नखांवर पांढरं! सुनेचा भयानक कट; डॉक्टरांच्या एका चाणाक्ष नजरेने उघडलं सासूच्या मृत्यूचं गूढ


हैदराबाद : २६ जुलै २०२३. ऐन तिशीत असलेल्या बाला शशीरेखा हिचं लग्न होऊन अवघे दोनच महिने झाले होते. अशातच तिला आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका रुग्णालयात स्ट्रेचरवरुन दाखल करण्यात आलं. शशीरेखा गेल्या काही काळापासून आजारी होती. तिला जुलाब आणि उलट्यांचा खूप त्रास होत होता. पाणी साचल्यामुळे तिचं शरीर सुजलं होतं. काही अवयव निकामी झाले होते. आठवड्याभरात तिच्या पालकांनी तिला अनेक डॉक्टरांकडे नेलं, परंतु शशीरेखाला नेमका कोणता आजार जडला आहे, याचं निदान कोणालाही करता आलं नाही. अखेर, तिला एका न्यूरोलॉजिस्टकडे नेण्यात आलं.

नखावरील पांढऱ्या रेषा

शशीरेखाचा हात हातात घेताच डॉ. वेमुरी राम तारकनाथ यांना काहीतरी विचित्र जाणवलं. तिच्या हाताच्या नखांवर आडव्या पांढऱ्या रेषा उमटल्या होत्या. या रेषांना 'मीज लाइन्स' (Mees' lines) असं म्हणतात. हे आर्सेनिक विषबाधेचे एक स्पष्ट लक्षण आहे. डॉ. तारकनाथ यामुळे सावध झाले आणि त्यांनी शशीरेखावर काही वैद्यकीय चाचण्या केल्या.
या चाचण्यांचे अहवाल आले, तेव्हा डॉ. तारकनाथ यांची भीती खरी ठरली. शशिरेखाच्या शरीरात आर्सेनिकचे प्रमाण सामान्य मर्यादेपेक्षा सुमारे दहा पट अधिक आढळलं होतं. तेलंगणा पोलिसांसमोर आता एक अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण उभं ठाकलं होतं. इंडियन एक्स्प्रेस वेबसाईटने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

शशिरेखा बचावली, पण तिची ६२ वर्षीय सासू तितकी नशीबवान ठरली नव्हती. ५ जुलै २०२३ रोजी एम. उमा महेश्वरी यांचं निधन झालं. हैदराबाद येथील त्यांच्या घरी आयोजित एका छोट्या समारंभात उमा यांच्या मुलाचं शशिरेखाशी लग्न ठरुन जेमतेम एक महिना झाला असतानाच ही घटना घडली.
उमा यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाला असावा, असा त्यांच्या कुटुंबाचा समज होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या स्मृतीचा आदर म्हणून अस्थी जतन करुन ठेवल्या. परंतु जेव्हा शशीरेखाला 'आर्सेनिक विषबाधा' झाल्याचं निदान झाले, तेव्हा शशीरेखाची नणंद एम. शिरीषा सावध झाली. ती सध्या युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास आहे.

घटस्फोटित नवऱ्यावर आरोप

शशीरेखाचे वैद्यकीय अहवाल जाहीर झाल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी- १८ ऑगस्ट रोजी शिरीषाने सायबराबाद येथील मियापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तिने आपल्या घटस्फोटित पतीवर आपल्या आईला विष दिल्याचा आरोप केला. त्यानंतरच्या महिन्यात या प्रकरणाचा भयंकर उलगडा झाला.

यूकेस्थित औषधनिर्माता असलेल्या अजित कुमार मुप्पारप्पू याने रचलेलं एक कट कारस्थान-त्याचा उद्देश आपली विभक्त पत्नी शिरीषा, तिचं कुटुंब आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कोणाही व्यक्तीची हत्या करणे हा होता.

सगळेच नातेवाईक आजारी पडले
३ जून २०२३ चा दिवस. हैदराबादच्या मियापूर भागातील 'साईनाथ एन्क्लेव्ह'मधील एका आलिशान आणि प्रशस्त अपार्टमेंटमध्ये लगबग सुरु होती. हा दिवस शिरीषाचा भाऊ एम. पूर्णेंद्र याचे गुंटूर येथील शशीरेखाशी लग्न निश्चित होण्याचा. घरात एक छोटासा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात केवळ जवळचेच नातेवाईक उपस्थित होते. या समारंभासाठी शिरीषाही यूकेहून खास आली होती. त्या दिवशी घरात उपस्थित सगळेच नातेवाईक आजारी पडले.
शिरीषा-अजितची दुसरी इनिंग

या कहाणीची सुरुवात २०१८ मध्ये झाली. पहिल्या लग्नातून घटस्फोट घेतलेल्या अजित आणि शिरीषा यांची मॅट्रिमोनियल साईटवर भेट झाली. शिरीषाची मुलगी त्यावेळी ७ वर्षांची होती; तर अजितलाही एक लहान मुलगा आहे. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने, हैदराबाद येथील एका आर्य समाज मंदिरात ते विवाहबंधनात अडकले.

सुरुवातीपासूनच काही संकेत मिळत होते, असं शिरीषा म्हणजे. या प्रकरणातील हैदराबाद पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, लग्नानंतर लगेचच अजितने शिरीषाचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती. हैदराबादमध्ये दोन महिने घालवल्यानंतर, ते यूकेला स्थलांतरित झाले; तिथे अजित सल्लागार म्हणून कार्यरत होता. "त्याच्याकडे औषधशास्त्राची पदवी होती, पण तो इतरही अनेक प्रकारची कामं करत असे," असं शिरीषा सांगते. शिरीषानेही तिथे जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र यूकेला जाताच तो माझा शारीरिक छळ करायला लागला. लहानसहान गोष्टींवरुन चिडायचा आणि मग माफी मागायचा. पण छळ असह्य झाला आणि मी घराबाहेर पडले, असं शिरीषा म्हणाली.

संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी
काही काळानंतरच अजितने शिरीषाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. "एकदा रस्त्यावर त्याने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि 'तुझा कायमचा काटा काढीन' असं म्हणत मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अवघ्या दोन महिन्यांतच, त्याने माझ्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचला" शिरीषा म्हणाली.

फार्मसीचे प्रशिक्षण घेतलेल्या अजितला माहित होते की त्याचं काम कशाने होऊ शकतं. नैसर्गिकरित्या आढळणारा घटक असलेल्या आर्सेनिकचा वापर सेमीकंडक्टर उद्योगापासून ते औषधे, काच आणि सिरॅमिक्सपर्यंत मोठ्या प्रमाणावर होतो. ते अत्यंत विषारी देखील आहे - म्हणूनच ते सहजासहजी मिळत नाही. अजितला त्याच्या बहिणीची आठवण झाली. विज्ञान शिक्षिका असल्याने ती शाळेच्या प्रयोगांच्या कोट्याअंतर्गत ते मिळवू शकत होती.
आर्सेनिक मिसळलेला मसाला

ही योजना तडीस नेण्यासाठी युकेहून आलेल्या अजितने मीठ आणि तिखटात 'आर्सेनिक' मिसळले आणि ते एका पाकिटातून शिरीषाच्या माहेरी पोहोचवले. तिचे पिता हनुमंत राव यांनी कोणीतरी मागवलं असेल, असा विचार करुन कोणत्याही संशयाविना ते पाकीट घेतलं. अजितला आपली योजना प्रत्यक्षात येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली; कारण शिरीषाच्या आई उमा बाहेरगावी गेली होती. त्यामुळे घरात स्वयंपाकाचं काम जवळजवळ थांबलं होतं.

एके दिवशी राव यांनी घाईघाईने एक ऑम्लेट बनवले. एकमेव गोष्ट त्यांना बनवता येत होती. त्यानंतर ते आजारी पडले. ही केवळ नेहमीचंच फूड पॉयझनिंग असेल, असं म्हणत त्यांनी स्वतःचीच समजूत काढली आणि उमा परत येण्याची वाट पाहू लागले. २० मे २०२३ रोजी उमा परतली.

पाण्याची चाचणी
"माझ्या आई-वडिलांना मळमळ आणि जुलाब यांसारखी सौम्य लक्षणं जाणवू लागली," असं शिरीषा सांगते. मे २०२३ ते जून २०२३ या कालावधीत पूर्णेंद्रच्या लग्नाच्या तयारीच्या निमित्ताने कुटुंबातील इतर सदस्य वारंवार घरी येत होते. जेव्हा घरातील सर्वांचीच प्रकृती खालावली, तेव्हा मी पाण्याचे नमुने तपासणीसाठी दोनदा पाठवले. पण, यामागे अन्न कारणीभूत असेल, अशी शंका मला कधीच आली नाही" असं शिरीषा म्हणते.

३ जून २०२३ रोजी शशीरेखा आणि पूर्णेंद्र यांचं एका छोटेखानी समारंभात लग्न झालं. काही दिवसांनंतर, शिरीषाची आई गंभीर आजारी पडली. हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात तिचं निधन झालं. "हृदयाची अनियमित धडधड, त्यामुळे फुफ्फुसांमध्ये तीव्र सूज येऊन श्वसनक्रिया बंद पडली" असं कारण नोंदवलं गेलं.

"माझ्या आईच्या निधनानंतरही, आम्ही तेच विषारी अन्न खात राहिलो कारण आम्ही तेच मसाले वापरत होतो ज्यात फेरफार केली होती. आणि आमच्यापैकी बहुतेकांना आर्सेनिक विषबाधा काय आहे हे कळण्याआधीच त्याची लक्षणं दिसू लागली," असं शिरीषा सांगते.
शशीरेखा आजारी पडली अन् उलगडा झाला

२० जुलै २०२३ ला शशीरेखाही आजारी पडली होती, तरीही तिने गुंटूर येथील आपल्या माहेरी प्रवास केला. "तो आषाढ महिना होता; या काळात नवविवाहित वधूंनी आपल्या माहेरी जाण्याची प्रथा असते. त्यानंतर काही दिवसांनी, तिच्या आई-वडिलांनी डॉ. तारकनाथ यांचा सल्ला घेतला" असं शिरीषा सांगते.

डॉ. तारकनाथ यांनी यापूर्वी कधीही 'मीज लाइन्स' असलेली रुग्ण प्रत्यक्ष पाहिली नव्हती. परंतु शशीरेखाच्या हाताच्या नखांकडे पाहताच त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील दिवसांची आठवण झाली. तिथे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी याविषयी अभ्यास केला होता. "त्या रेषा आणि संबंधित लक्षणे माझ्या लक्षात आली, मी त्या रुग्णाची 'आर्सेनिक' चाचणी करण्याचे आदेश दिले. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनीही ही चाचणी करुन घेतली," असे डॉ. तारकनाथ सांगतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या चाचणीचा अहवाल 'आर्सेनिक पॉझिटिव्ह' आला.

अजितचे तीन मित्र गजाआड
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता, त्यांना अजित आणि त्याच्या तीन मित्रांमधील संभाषणाचे अनेक तपशील आढळून आले. हैदराबादमध्ये एका हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेऊन राहिलेल्या त्या तिघांचा मागोवा घेत असताना, पोलिसांना असं समजले की, अजितने त्यांना शिरीषाच्या कुटुंबीयांना 'सक्सिनिलकोलीन' (succinylcholine) हे रसायन टोचण्यास सांगितले होतं. जर हे रसायन त्यांना टोचलं गेलं असतं, तर त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असता. आरोपपत्रानुसार, पोलिसांनी चार व्यक्तींना अटक केली; यांपैकी तीन जण हैदराबादचे रहिवासी होते आणि त्यांच्याकडे या विषाच्या बाटल्या सापडल्या. विशेष म्हणजे, शवविच्छेदनादरम्यान या विषाचा शोध घेणं अत्यंत कठीण असतं. पण ही योजना प्रत्यक्षात उतरलीच नाही. अगदी रस्ते अपघाताचाही प्लॅन यशस्वी ठरत नसल्याने अजितने सूत्र स्वतःच्या हातात घेतली.

ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत, पोलिसांनी अजितची बहीण मुप्पारापू सुरेखा हिच्यासह एकूण नऊ जणांना अटक केली. उमाच्या मृत्यूच्या आधीच्या काही महिन्यांत, अजित आणि त्याची बहीण यांच्यात वारंवार फोनवर संभाषण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, अजितने एका 'फूड डिलिव्हरी ॲप'च्या कर्मचाऱ्यामार्फत-त्याला २००० रुपये देऊन-आपल्या विभक्त सासरच्या घरी विषारी मसाले कसे पोहोचवले, याचा खुलासा सुरेखाने केला. अजितला १७ जानेवारी २०२५ रोजी यूके पोलिसांनी बर्कशायरमधील मेडनहेड येथे अटक केली. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याने आपल्या प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली असून, त्यात असे नमूद केले आहे की, "सायराबाद पोलिसांनी अटक केल्यानंतर माझ्या मानवाधिकारांचे उल्लंघन होईल" या याचिकेवरील पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.