Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार: 'नॉर्मल डिलिव्हरी'च्या प्रतीक्षेत दोन जीवांचा अंत.

वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार: 'नॉर्मल डिलिव्हरी'च्या प्रतीक्षेत दोन जीवांचा अंत.


बेळगाव : बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (बिम्स) जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना सोमवार (ता.१३) समोर आली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात तीव्र संताप व्यक्त केला असून, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कित्तुर तालुक्यातील हुनशिकट्टी गावातील ईरम्मा मटोळी (वय २१) यांना शुक्रवारी (ता. १०) प्रसूतीसाठी विम्स रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरी होईल, असे सांगितले होते. मात्र, योग्य वेळी उपचार न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप मृत महिलेचे पती नागाप्पा यांनी केला आहे.

"माझ्या पत्नीचा आणि बाळाचा मृत्यू झाल्यानंतर आमची सही घेण्यात आली. आम्ही प्रश्न विचारल्यावर 'आम्ही डॉक्टर की तुम्ही?' असे म्हणत आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले," असा आरोप त्यांनी केला. मृत महिलेची आई गौरव्वा यांनीही डॉक्टरांवर गंभीर आरोप करत सांगितले की, वेदना वाढल्यानंतर सिझेरियन करण्याची विनंती करूनही ती करण्यात आली नाही. 'ही तिची पहिली प्रसूती होती. वेळेत योग्य उपचार झाले असते, तर तिचा जीव वाचला असता,' असे त्या म्हणाल्या दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

याबाबत बिम्स प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. गर्भवती महिलेचा रक्तदाब वाढला होता व फुफ्फुसात पाणी साचल्याने (पल्मोनरी एडिमा) तिचा मृत्यू झाला असून, सिझेरियनचा याच्याशी संबंध नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय आवारात नातेवाइकांनी गर्दी केली होती. कोणतीच अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.