सांगली :- सांगली शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या चांदणी चौक येथील 'डायमंड परमिट रूम आणि बिअर बार' सध्या प्रशासकीय भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवत या ठिकाणी बार आणि वाईन शॉपच्या नावाखाली मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर नकाशाप्रमाणे परमिट रूम आणि दारू विक्रीचे दुकान (Counter) हे एकाच जागेत संलग्न असणे अनिवार्य आहे. मात्र, डायमंड परमिट रूममध्ये हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आला आहे. वरील मजल्यावर बार सुरू असताना, खालच्या गाळ्यात चक्क वाईन शॉपप्रमाणे दारूची विक्री केली जात आहे. सामान्य नागरिकांना हे नेमके वाईन शॉप आहे की परमिट रूम, हेच कळेनासे झाले आहे.
अधिकाऱ्यांचे 'आर्थिक हित' की कर्तव्यशून्यतेचा कळस?
कोणत्याही परमिट रूमला अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी कायदा देत नाही. तरीही, चांदणी चौकातील या दुकानावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मेहेरबान का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन होत असतानाही कारवाई करण्याऐवजी अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. यामागे मोठे 'आर्थिक हितसंबंध' जोपासले जात असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह?
मंजूर नकाशाची पायमल्ली करणाऱ्या या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता तरी कारवाईचा बडगा उगारणार का? की संबंधित दुकानदाराच्या आर्थिक ताकदीपुढे प्रशासन गुडघे टेकणार? सामान्य जनतेतून आता या बेकायदेशीर कृत्याची सखोल चौकशी करून परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे. आता चेंडू जिल्हा प्रशासनाच्या आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कोर्टात असून, ते 'नियम' पाळणार की 'नोटा' बघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्मश....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.