मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय: 'त्या' पुजाऱ्याला ५ वर्षांसाठी मज्जाव
तुळजापूर (जि. धाराशिव): तुळजाभवानी मंदिरात देवीला अभिषेक घालण्यासाठी व सिंहासन पूजेसाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. सकाळच्या सत्रात पाचऐवजी सहा सिंहासन पूजा झाल्याचे उघडकीस आले.
यावरून मंदिर प्रशासनाने कठोर भूमिका घेत सहावी अनधिकृत पूजा करणाऱ्या पुजाऱ्यावर ५ वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदी घातली आहे. शिवाय, संगनमताचा ठपका ठेवून सुरक्षा एजन्सीलाही १ लाखाचा दंड केला आहे.
तुळजाभवानी मंदिरात मूर्ती संवर्धनाच्या उद्देशाने पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मर्यादित अभिषेक व सिंहासन पूजा करण्यात येतात. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत पाच सिंहासन पूजा व उर्वरित अभिषेक पूजा केल्या जातात. तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दोन सिंहासन पूजा व उर्वरित अभिषेक असा पूजेचा नित्यक्रम चालतो. मात्र, २१ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सहावे सिंहासन घातल्याप्रकरणी युवा भोपे पुजारी मंडळाने मंदिर प्रशासनाकडे तक्रार केली.
दुर्लक्षाबद्दल सुरक्षा एजन्सीला लाखाचा दंड
सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे एजन्सीला १ लाख रुपयाचा दंड व सिंहासन पावतीचे ११०० रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या काळात धार्मिक व्यवस्थापक म्हणून जे कर्तव्यावर होते, त्यांचीही चौकशी करून कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.