दलिताने घोड्यावर बसणे सवर्णांना बोचले; नवरदेवाला खाली खेचून बेदम मारहाण, वरातीत प्रचंड राडा!
मध्य प्रदेशातील दमोह येथे मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी एका २३ वर्षीय दलित नवरदेवावर त्याच्या लग्नाच्या वरातीत हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
नवरदेव घोड्यावर स्वार होऊन पारंपरिक विधीनुसार गावातून जात असताना काही व्यक्तींनी त्याला अडवून घोड्यावरून खाली ओढले आणि काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण केली.
गोलू अहिरवार हा लग्नापूर्वी होणाऱ्या 'रचवाई' या विधीमध्ये सहभागी होता. या विधीत नवरदेव घोड्यावर बसून गावातून फेरी काढतो. मात्र, एका अरुंद गल्लीत त्याची वरात अडवण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रस्ता अडवण्यासाठी मुद्दाम एक वाहन उभे करण्यात आले होते. रस्ता मोकळा करण्याची विनंती केल्यानंतर स्थानिकांशी वाद झाला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले.
या गोंधळात नवरदेवाला घोड्यावरून खाली ओढण्यात आले आणि त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, व्हिडिओमध्ये हल्लेखोर वरातीतील लोकांनाही लक्ष्य करताना दिसतात. विशेष म्हणजे, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या नवरदेवावरही कोणतीही दया न दाखवता मारहाण करण्यात आली.
"आम्हाला वरात काढू दिली नाही"
नवरदेवाची आई विद्या अहिरवार यांनी सांगितले की, "आम्हाला वरात काढण्यास मनाई करण्यात आली. आम्ही विचारले की, नवरदेव घोड्यावर बसल्याशिवाय विधी कसा पूर्ण होणार? त्यावर त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली. माझ्या मुलीलाही मारले गेले आणि तिचे काही दागिनेही गायब झाले."
हल्ल्यादरम्यान सोन्याचे दागिने चोरीचा आरोप
नवरदेवाची बहीण मनीषा अहिरवार हिने सांगितले की, "मी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'असे विधी आमच्यासारख्या लोकांसाठी नाहीत." कुटुंबीयांनी हल्ल्यादरम्यान सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचाही आरोप केला आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. स्थानक प्रमुख सुधीर कुमार बेगी यांनी सांगितले की, आरोपींनी नवरदेवाच्या घोड्यावर बसण्यास विरोध केला आणि वरात अडवून हल्ला केला. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तणाव वाढू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर लग्नाचे उर्वरित विधी पार पाडण्यासाठी वर छतरपूर जिल्ह्याकडे रवाना झाला.
भाजप आमदार प्रीतम लोधी वादात
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रीतम लोधी यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते करेरा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला (SDOP) अपशब्द वापरताना आणि धमकावताना दिसत आहेत. यावरून 'IPS असोसिएशन'ने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.