केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे. देशात सध्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्स आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिलीय. कर्मचारी संघटना ८व्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याची मागणी करत असतानाच सरकारने महागाई भत्त्यात वाढीचा निर्णय घेतलाय.केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीच्या घोषणेला पहिल्यांदाच इतका उशीर झाला आहे. सर्वसामान्यपणे सरकारकडून जानेवारी ते जूनच्या सहामाहीसाठी होळीच्या दरम्यान, म्हणजेच मार्च महिन्यात निर्णय घेते. पण यंदा यासाठी उशीर झाला आहे. १० वर्षात पहिल्यांदाच सरकारने महागाई भत्त्याची घोषणा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात केलीय.
महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ही जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात २०२५च्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.