सांगली : पूर्वीच्या मारहाणीचा राग मनात धरून विनायक कुमार बालेश्वर चौधरी (वय २२, मूळ रा. जखरा वॉर्ड क्र. २, चंपारण, बिहार, सध्या रा. जुनी धामणी) या कामगाराचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याबाबत त्याचा साथीदार संशयित सोनू कुमार नाथूसहानी (वय २१, रा. तेलुहा वॉर्ड ०२, पश्चिम चंपारण, बिहार) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील आलास (ता. शिरोळ) येथे स्मशानभूमीच्या घाटाचे काम सुरू असताना किरकोळ कारणातून मृत विनायक कुमार आणि संशयित सोनु कुमार यांच्यात वाद झाला. तेव्हा विनायकने त्याला मारहाण केली. तेव्हा सोनूने त्याला 'तुने मुझे मारकर बहुत गलती की, तुझे देख लुंगा' अशी धमकी दिली होती. तेव्हा इतर साथीदारांनी त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता. परंतू सोनूच्या मनात हा राग धुमसत होता. विनायकने सोनुचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखी भर पडली होती. या कारणावरून त्यांच्यात कुरबुर सुरूच होती.आलास येथील कामानंतर काही दिवसापासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचे काम सुरू होते. त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी याने सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले होते. घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते. तेव्हा विनायक आणि सोनू हे दोघेजण घाटाकडे गेले होते. तेव्हा नशेत दोघांमध्ये वाद झाला. सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला. त्यामुळे त्याचा तडफडून रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर सोनूने आणखी एक कामगार मिथुन कुमार याला बोलवून रात्री साडे दहाच्या सुमारास घाटाकडे नेले.तेथे गेल्यानंतर मृतावस्थेत पडलेला विनायक त्याला दाखवला. 'मैने विनायक का गला काट दिया है, आपण दोनो इसको नदी मे फेक देंगे' असा म्हणाला. परंतू मिथूनने त्याला नकार दिला. तो तेथून निघाला. तेव्हा सोनुने त्याला 'किसीको मत बताना, नही तो तुझे भी मार दुंगा' अशी धमकी दिली. मिथुनने हा प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला. तेव्हा नागेंद्रने सेंट्रींग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे (रा. बोरगाव, ता. वाळवा) यांना हा प्रकार कळवला. बुरंगे यांनी रात्री साडे अकरा वाजता जुनी धामणी येथे येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचे दिसले.
दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पंचनामा केला. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोनुला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. कंत्राटदार सुशांत बुरंगे यांची फिर्याद नोंदवली आहे.
खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मंगळवारी रात्री दारूच्या नशेत विनायक आणि सोनू यांच्यात वाद उफाळून आला. तेव्हा सोनूने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून टाकला. खुनानंतर मृतदेह नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतू कामगार मिथून याने नकार देत मुकादमास हा प्रकार कळवला. त्यामुळे खून झाल्याचे निदर्शनास आले.
महिन्यापूर्वी झाला होता वाद
कोल्हापूर जिल्ह्यातील आलास येथे महिन्यापूर्वी कामाच्या ठिकाणी विनायक आणि सोनू यांच्यात वाद झाला होता. विनायकने मारहाण केल्यामुळे महिन्यापासून सोनूच्या मनात राग धुमसत होता असे तपासात स्पष्ट झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.