महिला आरक्षणावरुन देशभरात राजकारण तापले असताना भाजपाची भूमिका आणि नेमकी आकडेवारी यामधील विरोधाभास समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्षांवर महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत महिलांच्या राजकीय हक्कांची भ्रूणहत्या केल्याची टीका केली आहे.
मात्र, प्रत्यक्ष उमेदवारीच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे असल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातील महिला उमेदवारांच्या प्रमाण बघता भाजपाच्या भूमिकेकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याबाबतीत तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून त्यांनी तब्बल २७ टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. तर सर्वात कमी महिला उमेदवार भाजपाने दिले आहेत.
आकडेवारीनुसार, तृणमुलने २९१ उमेदवारांपैकी ५२ महिला उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याशिवाय डाव्या पक्षांनी एकत्रितपणे २३५ जागांवर उमेदवारी दिली असून त्यापैकी ३४ म्हणजेच सुमारे १३ टक्के महिला उमेदवार दिले आहेत. काँग्रेस पक्षाने २९४ पैकी ३५ महिला उमेदवार उभ्या केल्या आहेत, म्हणजेच काँग्रेसने जवळपास १२ टक्के जागा महिलांना दिल्या आहेत.महत्त्वाचे म्हणजे महिला आरक्षणावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सर्व २९४ जागांवर उमेदवार दिले असले तरी त्यापैकी केवळ ३३ महिला उमेदवार म्हणजेच ११ टक्केच महिलांना संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांनीही भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी लोकसभेतील आकडेवारीवरून भाजपाला लक्ष्य केल आहे.त्या म्हणाल्या, लोकसभेतील उमेदवारीतही भाजपने सर्वात कमी महिलांना संधी दिली आहे. भाजपाला खरोखरच महिलांची काळजी असेल, तर सर्व ५४३ जागांवर महिला आरक्षण लागू करावे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. दरम्यान, लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीला संसदेत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या राजकीय पराभवाला सामोरे जावे लागले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.