सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा नूतन आयुक्त मोहपात्रा यांनी स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासाच्या गप्पा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून किंवा वातानुकूलित केबिनमध्ये बसून बैठकांचा ससेमिरा लावण्यापेक्षा, आयुक्तांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याची नितांत गरज असल्याची भावना आता सांगलीकर व्यक्त करत आहेत.
केवळ 'विभागीय फेरफटका' नको, 'अॅक्शन' हवी!
नवे आयुक्त आले की सुरुवातीला घोषणांचा पाऊस पडतो, हे सांगलीकरांसाठी नवीन नाही. मात्र, शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा दर्जा तपासणे आवश्यक आहे.
रस्त्यांची दुरावस्था: अनेक भागांत रस्त्यांची चाळण झाली आहे, पॅचवर्कच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केली जाते.
स्वच्छतेचा बोजवारा: कचरा उठाव आणि ड्रेनेज लाईनचे प्रश्न 'जैसे थे' आहेत.
अतिक्रमणांचा विळखा: मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे केवळ कारवाईच्या घोषणांपुरती मर्यादित राहतात.
प्रशासनाचा वचक संपलाय का?
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सध्या मरगळ दिसून येत आहे. जोपर्यंत आयुक्त स्वतः 'फिल्ड'वर उतरून अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत नाहीत, तोपर्यंत खालच्या स्तरावरील कर्मचारी आणि कंत्राटदार ढिम्म राहण्याची शक्यता अधिक आहे. सांगलीच्या जनतेला आता आयुक्तांकडून कोणत्याही नवीन योजनांची 'पॅकेजिंग' नको आहे, तर असलेल्या समस्यांचे ठोस निराकरण हवे आहे. "आयुक्त महोदयांनी केवळ फाईलींवर स्वाक्षऱ्या करण्यापेक्षा शहराच्या गल्लीबोळात फिरून समस्या समजून घ्याव्यात. तरच या शहराचा कायापालट होईल. आम्हाला घोषणाबाजी करणाऱ्या आयुक्तांपेक्षा काम करणाऱ्या 'फिल्ड ऑफिसर'ची गरज आहे."
आव्हानांचा डोंगर, मोहपात्रांची कसोटी
सांगलीची भौगोलिक परिस्थिती आणि येथील राजकारण पाहता, नूतन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर आहे. मात्र, जर त्यांनी "केबिन कल्चर" सोडून थेट जनतेच्या प्रश्नांत लक्ष घातले, तरच त्यांना प्रशासनावर पकड मिळवता येईल. आता मोहपात्रा केवळ घोषणांचा पाऊस पाडतात की प्रत्यक्षात कामाचा धडाका लावून सांगलीकरांचा विश्वास जिंकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.