'गोकुळ' च्या राजकारणात भाजपला आणि पर्यायाने महाडिक गटाला वगळून सुरू असलेल्या हालचाली सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. वाढीव सभासदांवरून संघाची लागलेली चौकशी आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांचीच झालेली तडकाफडकी बदली या घडामोडी त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.
5 वर्षापुर्वी झालेल्या 'गोकुळ' च्या निवडणुकीत महाडिक विरोधक म्हणून सर्वजण एकत्र आले. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा पुढाकार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ यामुळे संघात सत्तांतर घडले. पण या निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण बदलले, त्याचे प्रतिबिंब जिल्ह्यातही उमटले. त्यातून महाडिक विरोधक असलेले सर्वजण राज्यात आणि जिल्ह्यातही एकाच छताखाली आले.
त्यातून 'गोकुळ' ची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवली जावी यासाठी भाजपचे आणि त्यातही महाडिक गटाचे प्रयत्न सुरू होते. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. 'गोकुळ' च्या अवसायानात काढलेल्या संस्था वगळाव्यात म्हणून न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केली, त्यांना महाडिक गटाचे बळ असल्याची चर्चा आहे.
यामागे असलेल्या अद्श्य शक्ती कोण ? असा प्रश्नही संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अलिकडेच विचारला होता. तथापि या संस्थांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात सौ. शौमिका महाडिक ह्या महाडिक गटाच्या संचालिकाही आघाडीवर होत्या. पण खरी शक्ती कोण असा प्रश्न उपस्थित होतो. याच संस्थांवरून महाडिक गटाला 'टार्गेट' करण्याचे प्रयत्न सुरू होते. महाडिक यांना वगळूनच 'गोकुळ' ची निवडणूक लढवायची अशा हालचाली सुरू होत्या.'गोकुळ' ची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून संचालकांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. पण त्यातही महाडिक यांना डावलण्यात आले. याउलट मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे व अन्य नेत्यांच्या भेटीच घेतल्या गेल्या. या घडामोडीतून महाडिक गट दुखावला गेला. परिणामी ३१ मार्चला वाढीव सभासदांची ऑनलाईन तक्रार आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल (ता. १) त्याच्या चौकशीचे निघालेले आदेश हे बरेच काही सांगून जातात.
या चौकशीचे आदेश पोहचत नाहीत तोपर्यंत या प्रक्रियेत महत्वाची भुमिका बजावत असलेले उपनिबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांच्या बदलीचे आदेश धडकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत याबाबत गेलेल्या तक्रारींचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. यातून मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट होत आहे. यातून 'गोकुळ' च्या राजकारणात भाजप आणि पर्यायाने महाडिक यांना वगळून काही चालणार नाही असाच संदेश या कारवाईतून दिल्याची चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.