"एअर इंडिया अपघातात सुखाचा संसार उद्ध्वस्त; १० महिन्यांनंतर आलेल्या 'त्या' ईमेलने २८ वर्षीय तरुणाच्या जखमा पुन्हा ताज्या"
अहमदाबाद : लंडनला जाण्यासाठी अहमदाबादहून झेपावलेले एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळून झालेल्या भीषण अपघातात पत्नी-मुलीला गमावून जवळपास दहा महिने उलटले असतानाच ९ एप्रिल रोजी २८ वर्षीय मोहम्मदमिया सेठवाला यांना यूकेच्या गृह मंत्रालयाकडून एक ईमेल आला.
यूकेमध्ये वास्तव्य करण्याबाबतचा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचं त्यांना या ईमेलमधून समजलं. 'द इंडियन एक्सप्रेस'च्या एका वृत्तानुसार, यूके सोडून भारतात परत जावे, यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना २२ एप्रिलपर्यंत 'इमिग्रेशन बेल' मंजूर केला होता.
आपली पत्नी सादिका आणि त्यांची चिमुकली मुलगी फातिमा यांना गमावल्याच्या दुःखातून अजूनही मोहम्मदमिया सेठवाला बाहेर पडलेले नाहीत. मूळचे बडोदा येथील रहिवासी असलेल्या सेठवाला यांना यूकेमधील स्थानिक न्यायालय त्यांना मदत करेल, अशी आता आशा आहे. जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी त्यांचे वकील करत आहेत. सेठवाला यांच्या म्हणण्यानुसार जर न्यायालयाने दिलासा दिला, तर त्यांना नवीन व्हिसासाठी अर्ज करणे शक्य होईल.
तीन वर्षांपूर्वी पत्नीसह यूकेमध्ये
२०२२ मध्ये, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी यूकेमध्ये आलेली पत्नी सादिका हिच्यासोबत, ते 'डिपेंडंट व्हिसा'वर यूकेला स्थलांतरित झाले होते. १२ जून रोजी विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडण्याच्या अवघ्या दोन महिने आधी-म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये सादिका आणि मोहम्मदमिया हे इंग्लंडमधील 'रग्बी' शहरात राहायला गेले होते. एका अहवालानुसार, सादिकाला तिथे नोकरी मिळाली होती आणि तीन महिन्यांचा 'प्रोबेशन' पूर्ण झाल्यानंतर तिला आपला 'वर्क परमिट' मिळेल, अशी तिला अपेक्षा होती.
शेजाऱ्यांच्या आर्थिक पाठिंब्याने यूकेला
'द इंडियन एक्सप्रेस'मधील वृत्तानुसार लंडनहून फोनवर बोलताना सेठवाला म्हणाले, "मी आणि सादिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहोत. आमच्या कुटुंबाकडे आम्हाला यूकेमध्ये स्थायिक करण्यासाठी पैसे नव्हते, पण आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला यूकेला जाऊन स्वप्नपूर्ती करता यावी, यासाठी पैसे गोळा केले होते. जेव्हा सादियाने तिचा अभ्यासक्रम पूर्ण करुन रग्बीमध्ये नोकरी मिळवली, तेव्हा तिला वर्क परमिट मिळवण्यासाठी तीन महिन्यांच्या प्रोबेशनवर ठेवण्यात आले. त्याच दरम्यान, तिने माझ्यासाठीही नोकरी मिळवली होती आणि आम्ही आमच्या पुढील आयुष्याची कल्पना करु लागलो होतो, जेणेकरुन आम्ही आमच्या शेजाऱ्यांचे उपकार फेडू आणि यूकेमध्ये स्थायिक होऊ. मला माहित नव्हते की नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते…"
सुट्टी नसल्याने आधी परत निघाली
नवीन नोकरी सुरू केल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आतच, मोहम्मदमिया यांच्या धाकट्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी, आपली मुलगी फातिमासोबत बडोद्याला जाण्याकरिता सादिकाने रजेचा अर्ज केला. "आम्हाला एकत्र परतीचा प्रवास करायचा होता; परंतु आम्ही दोघंही एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे, मॅनेजरने आम्हा दोघांनाही एकाच वेळी रजा देण्यास नकार दिला. त्यामुळे सादिका फातिमासोबत यूकेला आधी निघाली. त्या दुर्दैवी विमानाची तिकिटं आधीच आरक्षित करण्यात आली होती" असं सेठवाला यांनी म्हटल्याचं 'इंडियन एक्सप्रेस'ने वृत्त दिलं आहे. विमान अपघाताची बातमी समजताच, आपल्या मालकाच्या अटीनुसार नोकरीचा राजीनामा देऊन सेठवाला तातडीने भारतात परतले. अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर, सादिका आणि फातिमा यांची पार्थिवं त्यांना आणि बडोद्यातील त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
यूकेतील घरी रितेपणा
"मी जूनच्या अखेरीस यूकेला परत आलो. बडोद्यामध्ये मला फार काळ थांबता आलं नाही; कारण तिथे कुटुंबाला पाहताच मला सादिका आणि फातिमा यांची प्रकर्षाने आठवण येत असे. पण जेव्हा मी इथे आमच्या यूकेतील घरी परतलो, तेव्हा मला फारच मोठा मानसिक त्रास झाला. कारण अवघ्या काही महिन्यांपूर्वीच, या घरात खूप गजबज असायची. माझ्या पत्नी आणि बाळाचा सुगंध, बालगीतांचे सूर यांनी हे घर भरलेलं असायचे. त्यांचे कपडे आणि वस्तू सर्वत्र विखुरलेल्या असायच्या. नैराश्यामुळे मला रात्री झोपच लागत नसे" असं सेठवाला म्हणाले. मित्रांच्या आग्रहावरून त्यांनी एका खाजगी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला आणि त्यानंतर ते लंडनला स्थलांतरित झाले; तिथे सादिकाचे चुलत भाऊ-बहीण आणि त्यांचे मित्र त्याची काळजी घेत आहेत.
'डिपेंडंट व्हिसा'ची मुदत संपली
"मी पुन्हा व्हिसासाठी अर्ज करण्याचा आणि माझ्या वर्क व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करू शकेल अशी, नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही आणि जानेवारीमध्ये माझ्या 'डिपेंडंट व्हिसा'ची मुदत संपली. माझ्या वकिलाने मला सांगितले की, मी 'शोकग्रस्त जोडीदार' (bereaved spouse) या श्रेणीत बसत नाही; शिवाय, विमान अपघातात यूकेच्या व्हिसाधारकाचा मृत्यू होण्याची ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे" असंही सेठवाला म्हणाले.
सेठवाला यांनी पुढे सांगितले की, एअर इंडियानेही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना लंडनमधील 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स'मध्ये नोकरीची ऑफर दिली होती; परंतु जानेवारीमध्ये त्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्याने, त्यांना ती ऑफर नाकारावी लागली.
शेजाऱ्यांचं ऋण फेडायचंय
कंपनी सेक्रेटरीचा 'फाउंडेशन कोर्स' उत्तीर्ण केलेले सेठवाला यूकेला स्थलांतरित होण्यापूर्वी करविषयक क्षेत्रात कार्यरत होते. "अधिक चांगलं आयुष्य घडवण्याचं सादिकाचं स्वप्नच आम्हाला इथे घेऊन आलं. तिने तिथेच तिचा 'सीए फाउंडेशन कोर्स' पूर्ण केला होता आणि आमचं भविष्य अत्यंत उज्ज्वल होतं. आता ती हयात नसल्यामुळे, ज्या दयाळू शेजाऱ्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली होती, त्यांचं ऋण मला फेडलंच पाहिजे." अशा भावना सेठवाला यांनी व्यक्त केल्या.
भारतात परतल्यास जीवघेणे विचार
यूकेमध्ये एकटं राहणं हाच आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, असं सेठवाला यांना वाटतं. "भारतात परतल्यास मला सतत सादिका आणि फातिमा यांची आठवण येत राहील-जेव्हा जेव्हा मी माझ्या कुटुंबाला पाहीन, घरातील मुलांना पाहीन... किंवा सादिकाच्या आईला, जी माझी मावशी आहे, तिला पाहीन, तेव्हा तेव्हा ती आठवण उफाळून येईल. ज्या दुर्दैवी रीतीने मी त्यांना गमावलं, ज्या प्रकारे मला त्यांचे अखेरचे दर्शनही घेता आले नाही, ते सर्व मला पुन्हा पुन्हा आठवत राहील. यूकेमध्ये माझ्या चुलत-मावस भावंडांच्या आणि मित्रांच्या सहवासात राहिल्यामुळे, मला माझ्या कामावर आणि पुढील आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यास नक्कीच मदत होईल..."
अहमदाबाद-लंडन विमान अपघात
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जाणारे 'बोईंग ७८७' हे विमान १२ जून २०२५ रोजी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळले. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळून आदळल्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला - यामध्ये २४१ विमान प्रवासी व कर्मचारी आणि जमिनीवर असलेल्या १९ जणांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.