Big Breaking! "कोर्ट माझं वाकडं करू शकत नाही!" पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या मुलाच्या मुजोर बापाला खाकीचा हिसका; कोल्हापुरात काँग्रेस नेत्याला मोठा दणका!
काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि त्यांचा मुलगा चंद्रसेन चव्हाण याने पोलिसांची कॉलर धरत शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनांच्या गाडी आडवी मारून, काँग्रेसचा माजी नगरसेवक असलेल्या सचिन चव्हाण यांनी "कोर्ट माझं काही वाकडं करू शकत नाही" असं म्हणत थेट पोलिसांना आव्हान दिलं आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सचिन चव्हाण आणि चंद्रसेन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन दादू कुंभार यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन दादू कुंभार हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी मध्यरात्री गस्त घालण्यासाठी ते पोलीस वाहनातून पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासमवेत बाहेर पडले. गस्तीवर असताना मंगळवारी 19 मेच्या रात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही तरुण रंकाळा तलावासमोरील चेंज-मी फिटनेस सेंटर समोर असणाऱ्या कमानीत मोठमोठ्याने आरडाओरडा, दंगामस्ती करत असल्याचं दिसून आलं.
यावेळी पोलीस निरीक्षक लोंढे व सचिन कुंभार यांनी तरुणांना समजावून सांगत असताना चंद्रसेन सचिन चव्हाण याने पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. "तुम्हाला काय करायचंय, जातो की" असं उद्धट मोठ्या आवाजात रागाने बोलत कुंभार यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांची कॉलर धरुन "****त तुला माहिती नाही का मी कोण आहे? थांबा तुम्हाला माझा बाप कोण आहे ते दाखवतो" अशी शिवीगाळ करत "मी चंद्सेन चव्हाण आणि माझा बाप सचिन चव्हाण आहे, तुम्हाला आता दाखवितो" अशा शब्दांत धमकी दिली.दरम्यान, पोलीस निरीक्षक लोंढे हे चंद्रसेन चव्हाणला पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना सचिन चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. टिंबर मार्केट कमानीच्या समोर पोलिसांच्या वाहनाला आपली गाडी आडवी घालून "तुम्ही माझ्या मुलाला कसं घेऊन जाता पाहतोच, माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय का?" अशा शब्दांत पोलिसांशी वाद घातला. इतकंच नव्हे तर "तुम्हाला काय कारवाई करायची ती करा, कोर्ट आमचं काय वाकडं करणार? उद्या त्याला सोडवून आणतो" तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी या दोघा बापलेकाला चांगलाच दणका दिला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या दोघांवर पोलिसांना शिवीगाळ, वर्दीवर हात टाकणे, धमकी देणे तसंच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.