सरन्यायाधीशांच्या 'त्या' विधानाचा तरुणांनी केला 'Meme सर्जिकल स्ट्राईक'; देशात 'कॉक्रोच जनता पार्टी'चा धुमाकूळ!
झुरळ जनता पार्टी चळवळ
सरन्यायाधीश यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी म्हणून या डिजिटल चळवळीचा उदय झाला. अगदी थोड्याच कालावधीत या चळवळीला अनेकांनी जोरदार पाठिंबा दिल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. समाज माध्यमावर 'कॉक्रोच जनता पार्टी'चे इंस्टाग्रामवर ४० लाखांहून अधिक आणि एक्स (X) वर जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले आहेत. अधिकृत नोंदणी नसलेल्या या पार्टीची समाज माध्यमांमध्ये मात्र प्रसिद्ध वाढत असल्याचे चित्र आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील या चळवळीला पाठिंबा दर्शवला आहे.
सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे वाद
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी १५ मे रोजी एका सुनावणीवेळी बेरोजगार तरुणांवर टिप्पणी केली. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावर ऑनलाईन जोरदार टीका झाली. काही बेरोजगार तरुण झुरळासारखे आहेत, ज्यांना व्यवसायात काही स्थान नाही. यातील काहीजण माध्यमं होतात, काहीजण समाज माध्यमं होतात, माहिती अधिकार कार्यकर्ते होतात आणि ते सर्वांवर हल्ले करु लागतात, असे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले. दरम्यान, सरन्यायाधीशांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण दिले.
२० सदस्य नोंदणी
सरन्यायाधीशांचे वक्तव्य समोर आल्यानंतर १६ मे रोजी 'कॉक्रोच जनता पार्टी'चा जन्म झाला आणि ही चळवळ सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. तीन दिवसांत २० लाख सदस्यांनी या चळवळीत सहभाग नोंदवला.
कोणी सुरु केली ही चळवळ?
ही डिजिटल चळवळ अभिजीत दीपके (३०) यांनी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत पूर्वी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियाचे काम पाहत होते. या चळवळीला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती, अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी मिंटशी बोलताना दिली.
पाच-कलमी जाहीरनामा
या चळवळीचा विनोदी शैलीतून टीका करण्याचा सूर असला तरी, पक्षाने राजकीय उत्तरदायित्व, माध्यमांवरील नियंत्रण, स्त्री-पुरुष प्रतिनिधित्व आणि निवडणूक सुधारणा यांसारख्या मुद्द्यांना स्पर्श करणारा पाच-कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
वाढता पाठिंबा
टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांनी देखील या 'पार्टीला' सामील होण्याची जाहीरपणे इच्छा व्यक्त केल्यानंतर या चळवळीला अधिक गती मिळाली. झुरळ जनता पार्टीला भारतीय-अमेरिकन उद्योजक सबीर भाटिया यांचाही पाठिंबा मिळाला आहे. एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये भाटिया यांनी या चळवळीची प्रशंसा केली.
सरन्यायाधीश सूर्य कांत नक्की काय म्हणाले होते?
पीटीआयच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलाने स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दात ताशेरे ओढले.
"समाजात अनेक परजीवी वावरत आहेत, ते सातत्याने व्यवस्थेला लक्ष्य करत असतात. तुम्हाला देखील त्यांची हात मिळवायचा आहे का?", असा थेट सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला. तसेच, "कदाचित सगळचे जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल. पण, किमान तुम्ही तरी या पदासाठी पात्र नाहीत", असा शब्दात खंडपीठाने वकिलाला खडसावले. "दिल्ली उच्च न्यायालयाने जरी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली असती तरी तुमचे व्यावसायिक वर्तन पाहता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असता", असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले.
सरन्यायाधीशांचा खुलासा
सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत याबाबत खुलासा करताना माध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे आपल्याला वेदना झाल्याचे म्हटले. आपण केलेले वक्तव्य हे बेरोजगार तरुणांबद्दल केलेले नसून बनावट पदवीधारकांना उद्देशून होते, असे सरन्यायाधीशांनी वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. "काल एका क्षुल्लक खटल्याच्या सुनावणीदरम्यान मी नोंदवलेल्या तोंडी निरीक्षणाचा विपर्यास करून काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांमध्ये आपण तरुणांवर टीका केल्याचे वाचून मला वेदना झाल्या. मी विशेष करून बनावट पदव्यांच्या मदतीने विधिव्यवसायात प्रवेश केलेल्यांवर टीका केली होती. अशाच व्यक्तींनी माध्यमे, समाजमाध्यमे आणि इतर चांगल्या व्यवसायातही शिरकाव केला आहे आणि या अर्थाने ते परजीवी आहेत," असे न्या. कांत यांनी आपल्या खुलाशात नमूद केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.