Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नॉर्वेच्या वृत्तपत्राचा उद्दामपणा! पीएम मोदींची आक्षेपार्ह कार्टूनद्वारे बदनामी; नेटकऱ्यांनी फटकारले

नॉर्वेच्या वृत्तपत्राचा उद्दामपणा! पीएम मोदींची आक्षेपार्ह कार्टूनद्वारे बदनामी; नेटकऱ्यांनी फटकारले


'भारतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप होत असताना भारतावर विश्वास का ठेवावा,' असा खोचक प्रश्न नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन यांनी नॉर्वेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. यावरून मोठा वाद निर्माण झालेला असतानाच नॉर्वेमधील एका वृत्तपत्राने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'गारुडी' म्हणून चित्रण करणारे एक आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. यामुळे पाश्चात्य देशांमधील जुन्या पूर्वग्रहांचे समर्थन होत असल्याचे आरोप केले जात आहेत. युरोपीय देशाच्या दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने पंतप्रधानांना विचारलेल्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादानंतर हे व्यंगचित्र समोर आले आहे.

'आफ्टेनपोस्टन'  मधील या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हातात सापाच्या आकाराची इंधन भरण्याची पाइप दाखवण्यात आली आहे. हे व्यंगचित्र 'एक हुशार आणि थोडे त्रासदायक गृहस्थ' (A clever and slightly annoying man) या शीर्षकाच्या लेखासोबत प्रसिद्ध करण्यात आले आहे. या व्यंगचित्रामुळे इंटरनेटवर तीव्र संताप व्यक्त होत असून, अनेकांनी याला उघडपणे वर्णद्वेषी आणि भारताला 'गारुड्यांचा देश' म्हणून दाखवणाऱ्या जुन्या वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक म्हटले आहे. हे चित्रण वर्णद्वेषी असून भारत आणि त्यांच्या लोकनियुक्त नेत्याचा अपमान करणारे आहे, असे म्हणत नेटकऱ्यांनी या वृत्तपत्रावर कडक शब्दांत टीका केली आहे. 
एका युझरने एक्स (ट्विटर) वर लिहिलं, 'हे व्यंगचित्र उघडपणे वर्णद्वेषी आहे. यामध्ये एक मोठी विसंगती दिसून येते. पंतप्रधान मोदी आधी बोलले होते की, जग पूर्वी भारताला 'गारुड्यांचा देश' समजायचे आणि आता, त्यांच्या ओस्लो दौऱ्यादरम्यान एका मोठ्या युरोपीय वृत्तपत्राने त्यांचे अगदी तसेच चित्रण केले आहे.' दुसऱ्या एका युझरने लिहिलं, 'युरोपियन अजूनही त्यांच्या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत.' इतर अनेकांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत, पाश्चात्य उच्चभ्रू माध्यमांमध्ये अजूनही वसाहतवादी अहंकार जिवंत आहे या मताचा पुनरुच्चार केला.
असाच वाद २०२२ मध्येही निर्माण झाला होता. त्यावेळी एका स्पॅनिश वृत्तपत्राने भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दलच्या बातमीत गारुड्याच्या प्रतीकाचा वापर केला होता. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील भाषणात उल्लेख केला होता की, पूर्वी भारताची प्रतिमा परदेशात 'गारुड्यांचा देश' अशी होती, परंतु आता भारत तंत्रज्ञानाने चालणारा देश बनला आहे. त्यांनी नंतर इतर जागतिक मंचांवरही भारताचे हेच रूप वारंवार मांडले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.