Big Breaking ! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक, लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांची कारवाई
केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला शनिवारी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांच्या मुलाविरोधात पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार केली होती. त्याआधारे ८ मे रोजी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात चौकशीसाठी भगीरथ पोलिसांसमोर शरण गेल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. अटकेच्या कारवाईआधी केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या मुलाला पोलिसांना शरण जाण्याचे आणि तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. गेल्या आठवड्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मुलाला पोलीस तपासात सहकार्य करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले होते.
नेमकं प्रकरण काय?
पेटबशीराबाद पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४ आणि ७५ अन्वये लैंगिक शोषण तसेच, पॉक्सो अंतर्गत कलम ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, आरोपीने कथितरित्या जून २०२५ मध्ये मुलीला लग्नाचं खोटं वचन देऊन शरीरसंबंध ठेवले.
ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत तिला विचित्र वर्तन करण्यासाठी तसेच दारू पिण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे आरोप आहेत. ७ जानेवारीला त्यांच्यातील नाते संपुष्टात आले. त्यानंतर मुलीने नैराश्यातून दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तर भगीरथकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या आईवडिलांनी त्याच्याकडून पाच कोटी रुपये लुबाडण्याचे प्रयत्न केले आणि पैसे दिले नाहीत तर मुलगी आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.