बारामतीचा ‘जावई’ अखेर निलंबित! लाचखोर RTO राजेंद्र केसकरला शासनाचा मोठा दणका; मुख्यालय मुंबईला हलवले!
गोंदिया :-भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेल्या गोंदिया येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) राजेंद्र सदाशिव केसकर याला अखेर महाराष्ट्र शासनाने जोरदार दणका दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर केसकरला शासकीय सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. 'बारामतीचा जावई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे परिवहन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गृह विभागाने जारी केलेल्या अत्यंत कडक शासन आदेशानुसार, राजेंद्र केसकर याच्यावर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. ६९७/२०२५ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) मधील कलम ७(अ) व १२ अन्वये ५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याखाली केसकरला अटकही झाली होती आणि सध्या या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास कसून सुरू आहे.
२९ एप्रिलपासून निलंबन लागू!
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ अंतर्गत असलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून सरकारने केसकरला २९ एप्रिल २०२६ पासून शासकीय सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे.
मुंबईबाहेर जाण्यास बंदी!
निलंबन काळातील केसकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याचे मुख्यालय आता थेट परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्याला मुंबई सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमानुसार त्याला केवळ निर्वाह आणि महागाई भत्ता दिला जाईल.
हा कडक कारवाईचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून, उपसचिव चेतन निकम यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असाच इशारा या कारवाईतून शासनाने दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.