महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना! शनी अमावस्येच्या रात्री भोंदूबाबाचा थरार; पूजेच्या नावाखाली तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
धुळे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि सोलापूरचा 'मनोहर मामा' यांच्या भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथील भोंदूबाबा योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार याच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह
जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी खून झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावं आहेत. मृत जयश्री ही एका फायनान्स कंपनीत काम करत होती, तर अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. याशिवाय त्याचा वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय देखील होता.
अशी उघडकीस आली घटना
शनिवारी सकाळी साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते आणि तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा असल्याचं निष्पन्न झालं.जयश्रीचे काका संजय हिरे यांनी निजामपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या रात्री पूजेसाठी भोंदू बाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. तेथे पूजाविधी झाल्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान हत्येत झाले. भोंदू बाबाने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्याचा खून केला, तर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला.
'त्या' एका रुमालाने फुटले भोंदूचे बिंग
घटनास्थळी पोलिसांना एक केशरी रंगाचा रुमाल आढळून आला होता. हा रुमाल या तपासात अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. पोलीस श्वान पथकाला हा रुमाल सुंघवण्यात आला असता, श्वानाने थेट भोंदूबाबा योगेश खैरनार याच्या मठाचा रस्ता दाखवला. पोलिसांनी संशयावरून तातडीने भोंदूला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
भोंदू बाबाचा बनाव आणि मृतदेहाची विल्हेवाट
अटक टाळण्यासाठी भोंदू बाबाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. "जयश्रीचा खून दुसराच एक जण करत होता, मी तिला वाचवायला गेलो आणि त्या झटापटीत माझ्या हातून त्या तरुणाचा खून झाला," असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलिसी चौकशीत हा बनाव टिकला नाही. त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ उभांरडी येथील वनक्षेत्रात पुरल्याचे कबूल केले. मृतदेह वाहून नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता, ज्याच्या चाकांचे निशाण जमिनीवर आढळून आले आहेत. पोलिसांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पोलीस तपास सुरू
निजामपूरचे पोलीस अधिकारी मयुर भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे दोघे मृत नेमके कोणत्या पूजेसाठी भोंदू बाबाकडे आले होते, याचा सखोल तपास केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार हा नरबळीचा प्रकार असल्याचे दिसून येत नाही. या गुन्ह्यात भोंदू बाबाला आणखी कोणी मदत केली आहे का? या दिशेने सध्या तपास सुरू आहे." पोलिसांनी आरोपी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.