Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सरवर आता फक्त ७ मिनिटांत उपचार! भारतात लाँच झाले 'हे' विशेष इंजेक्शन; वाचा संपूर्ण सत्य

कॅन्सरवर आता फक्त ७ मिनिटांत उपचार! भारतात लाँच झाले 'हे' विशेष इंजेक्शन; वाचा संपूर्ण सत्य


‘कर्करोग’ असे नावही ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भारतातही या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक तरुण-तरुणींना कर्करोगाने जणू विळखाच घातल्याचे दिसून येत आहे. या आजारावर उपचारासाठी रुग्णांना महागडी केमोथेरपी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक तास त्यांना रुग्णालयात थांबून राहावे लागते. मात्र, आता कर्करोगावर प्रभावी ठरणारे 'Tecentriq SC – Atezolizumab’ हे नवे इंजेक्शन भारतात दाखल झाले आहे. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या काही प्रकारांवरील उपचारांसाठी हे औषध वापरले जाणार आहे, त्याविषयी…

'टेसेन्ट्रिक एससी' म्हणजे नेमके काय?
स्वित्झर्लंडमधील ‘Roche’ या आघाडीच्या औषधनिर्माता कंपनीने कर्करोगावर प्रभावी ठरणारे औषध भारतात आणले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 'टेसेन्ट्रिक एससी' हे इंजेक्शन अवघ्या सात मिनिटांत रुग्णाच्या शरीरात सोडले जाते आणि ते फुफ्फुसांचा कर्करोगावर अत्यंत प्रभावी ठरते. त्याशिवाय यकृताच्या कर्करोगवरही कायमस्वरुपी मात करण्यासाठी हे औषध गुणकारी ठरू शकते. भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली 'टेसेन्ट्रिक एससी' ही औषधाची सबक्युटेनियस आवृत्ती आहे. याचा अर्थ असा की, तासनतास चालणाऱ्या किमोथेरेपी प्रक्रियेऐवजी या इंजेक्शनाद्वारे अवघ्या सात मिनिटांत रुग्णावर उपचार केले जाऊ शकतात. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या काही प्रकारांवर उपचारासाठी वापरली जाणारी ही जगातील पहिली सबक्युटेनियस इम्युनोथेरपी मानली जात आहे. भारताचे औषध महानियंत्रकांनी (DCGI) फेब्रुवारी महिन्यातच या औषधाला फुफ्फुसांच्या कर्करोगावरील उपचारासाठी मंजुरी दिली होती.

'टेसेन्ट्रिक एससी' औषधाची किंमत किती?

कर्करोगावर प्रभावी मानल्या जाणाऱ्या 'टेसेन्ट्रिक एससी' औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे तीन लाख ७० हजार रुपये असून, ते दर तीन आठवड्यांनी घ्यावे लागते. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे लाभार्थीही या औषधाचा लाभ घेऊ शकतात. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, रुग्णांना या औषधाच्या साधारणपणे सहा डोस घ्यावे लागू शकतात. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘हिंदू बिझनेस लाईन’ला दिलेल्या माहितीनुसार, हे औषध सध्या जर्मनीतून आयात केले जात आहे. या औषधाच्या सबक्युटेनियस आवृत्तीला सर्वप्रथम २०२३ मध्ये युनायटेड किंगडममध्ये (UK) मंजुरी मिळाली होती. सध्या हे औषध जगातील ८५ देशांमध्ये उपलब्ध असून, आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्णांना ते देण्यात आले आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, या औषधाची मूळ ‘इन्फ्राव्हेनस’ (IV) आवृत्ती (जी देण्यासाठी अनेक तास लागतात) भारतात २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हे औषध फुफ्फुस आणि मूत्रमार्गाशी संबंधित कर्करोगांवर अत्यंत प्रभावी मानले जाते.

टेसेन्ट्रिक एससी' नेमके कसे काम करते?
'टेसेन्ट्रिक' हे औषध कर्करोगग्रस्त रुग्णांच्या शरीरातील PD-L1 शरीरातील रिसेप्टर्सना (थेट संपर्क यंत्रणा)लक्ष्य करून काम करते. मात्र, त्याआधी PD-1 आणि PD-L1 म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. 'लंग डॉट ऑर्ग' या वेबसाईटच्या माहितीनुसार, PD-1 हा शरीरातील एक रिसेप्टर असून तो टी-सेल्ससारख्या प्रतिकारशक्तीतील पेशींच्या पृष्ठभागावर असतो. सामान्य परिस्थितीत हा रिसेप्टर 'ब्रेक पॅड'सारखे काम करतो आणि शरीरातील निरोगी ऊतींवर प्रतिकारशक्तीतील पेशींनी हल्ला करू नये यासाठी नियंत्रण ठेवतो. मात्र, काही प्रकारचे कर्करोग शरीरात PD-L1 रिसेप्टर्स तयार करतात. हे रिसेप्टर्स ‘टी-सेल्स’वरील ‘PD-1’ रिसेप्टर्सशी जोडले जातात आणि रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देऊन, कॅन्सरच्या घातक पेशींवर हल्ला न करण्याचा संदेश देतात. ‘टेसँट्रिक’ हे औषध याच घातक ‘PD-L1’ रिसेप्टर्सना ब्लॉक करण्याचे काम करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली पुन्हा सक्रिय होते आणि कॅन्सरच्या पेशींना ओळखून त्यांचा नाश करू शकते.
औषधासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

'द प्रिंट'च्या वृत्तानुसार, 'टेसेन्ट्रिक एससी' या औषधामध्ये ‘अटेजोलिझुमॅब’ या घटकाबरोबरच अमेरिकेच्या ‘हॅलोझाइम थेरप्युटिक्स’ या बायोटेक कंपनीचे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे त्वचेखालील ऊती काही काळासाठी अधिक सच्छिद्र बनतात. त्यामुळे औषध अधिक प्रभावीपणे रक्तप्रवाहात मिसळू शकते. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, प्रशिक्षित परिचारिकांद्वारे हे इंजेक्शन रुग्णाच्या मांडीवर दिले जाऊ शकते. याबाबत नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. सज्जन राजपुरोहित यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या साधारण निम्म्या रुग्णांमध्ये ‘PD-L1’ रिसेप्टर्सना प्रमाण लक्षणीय असू शकते, ज्यामुळे हे औषध त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, टेसँट्रिक औषधामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामध्ये फुफ्फुसांचे विकार, आतड्यांचे त्रास, यकृताशी संबंधित समस्या, हार्मोन ग्रंथींमधील बिघाड, मूत्रपिंडाचे विकार, त्वचेचे त्रास आणि शरीरातील इतर अवयवांमधील समस्यांचा समावेश आहे.

‘टेसेन्ट्रिक एससी’ औषधाचे फायदे काय?
'टेसेन्ट्रिक एससी' या औषधामुळे कर्करोगावरील संपूर्ण उपचार प्रक्रिया केवळ सात मिनिटांत पूर्ण होत असल्याने त्याचा रुग्ण आणि रुग्णालये या दोघांनाही मोठा फायदा होत आहे. ‘दी इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, एका रुग्णावर सलाईनद्वारे दिली जाणारी किमोथेरपीसाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्याच वेळात रुग्णालये या ‘सबक्युटेनियस’ (त्वचेखालील) इंजेक्शनद्वारे किमान पाच रुग्णांवर उपचार करू शकतात. याबाबत डॉ. सज्जन राजपुरोहित यांनी 'द प्रिंट'ला सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात सध्या अर्ध्या डझनहून अधिक रुग्ण ‘टेसेन्ट्रिक एससी’ उपचार घेत आहेत. त्यापैकी दिल्लीतील एका ८० वर्षीय महिलेचे कर्करोगामुळे जवळपास सात किलो वजन घटले होते, तिच्या खोकल्यातून रक्तही येत होते आणि तीव्र वेदनाही होत होत्या. या महिलेने केमोथेरपी घेण्यास नकार दिला होता. 

त्यानंतर डॉक्टरांनी तिला दर तीन आठवड्यांनी 'टेसेन्ट्रिक एससी' इंजेक्शन देण्यास सुरुवात केली. "फक्त एका आठवड्यात तिची प्रकृती सुमारे ३० टक्क्यांनी सुधारली. तिसऱ्या डोसपर्यंत तिची तब्येत जवळपास ८० ते ९० टक्के पूर्वीसारखी झाली होती," असे डॉ. राजपुरोहित यांनी सांगितले. अशाच प्रकारे, एका ५७ वर्षीय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीनेही केमोथेरपी घेण्यास नकार दिला होता. त्याच्या मेंदू, यकृत आणि हाडांपर्यंत कर्करोग पसरला होता. त्यालाही इंजेक्शनद्वारे 'टेसेन्ट्रिक एससी' औषध देण्यात आले. "कर्करोगावरील उपचार इतका सोपा असू शकतो, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. जर एखाद्या उपचारामुळे रुग्णाला त्रास किंवा वेदना होत नसतील, तर तो रुग्ण उपचार स्वीकारण्यास आनंदाने तयार होतो," असेही डॉ. राजपुरोहित यांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.