Big Breaking! भाजपच्या गळाला लागलेले युवराज गायकवाड, सुरेश बंडगर अडचणीत; 'थेट' प्रवेश नडला, नगरसेवकपद जाणार?
राष्ट्रवादी (शरद पवार) गट सोमवारी कोर्टात जाणार; पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा उगारणार, सांगलीच्या राजकारणात खळबळ! सांगली महानगरपालिकेत सध्या सुरू असलेल्या राजकीय 'तोडफोडी'च्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे संख्याबळ वाढवण्यासाठी खेळण्यात आलेल्या खेळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन नगरसेवक पुरते फसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बंडगर यांनी घाईगडबडीत केलेला भाजप प्रवेश त्यांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता असून, त्यांच्या नगरसेवकपदावर आता अपात्रतेची टांगती तलवार आली आहे.
नेमकी चूक कुठे झाली? 'ते' अमिष की घाई नडली?
विकासकामांच्या नावाखाली आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर करत असले, तरी तांत्रिक आणि कायदेशीर पातळीवर त्यांनी स्वतःचेच पाय कुऱ्हाडीवर मारून घेतल्याचे बोलले जात आहे.
कायद्याचा काय सांगतो नियम?
कोणताही लोकप्रतिनिधी ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो, त्याला थेट दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येत नाही. जर त्यांना भाजपला साथ द्यायचीच होती, तर ते बाहेरून पाठिंबा देऊ शकले असते किंवा स्वतंत्र गट स्थापन करून सहयोगी म्हणून काम करू शकले असते. मात्र, कायदेशीर सल्ला न घेता थेट भाजपचा झेंडा हाती घेतल्यामुळे ते 'पक्षांतर बंदी कायद्याच्या' (Anti-Defection Law) कचाट्यात थेट अडकले आहेत.
राष्ट्रवादीचा थेट 'एक्शन मोड'; सोमवारी कायदेशीर रणसंग्राम!
आपल्या घरात उघड उघड दरोडा टाकणाऱ्या भाजपला आणि गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आता पूर्णपणे आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी या दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाईची पूर्ण तयारी केली आहे.
सोमवारी दाखल होणार याचिका: राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी येत्या सोमवारी या दोन्ही नगरसेवकांविरोधात अधिकृतपणे कायदेशीर कारवाई सुरू करणार आहेत.
आठवड्याभरात फैसला? राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, हा खटला अत्यंत मजबूत असून येत्या आठवड्याभरातच या नगरसेवकांचे पद राहणार की जाणार, याचा फैसला होऊ शकतो.
भाजपचा केविलवाणा प्रयत्न की नगरसेवकांचा आत्मघात?
सांगली पालिकेत सत्ता टिकवण्यासाठी किंवा संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप नेते हे असले केविलवाणे प्रयत्न करत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून होतोय. मात्र, भाजपच्या या जाळ्यात अडकलेले गायकवाड आणि बंडगर यांना भाजपने नेमके कोणते आमिष दाखवले होते? आणि कोणत्या आमिषाला बळी पडून त्यांनी स्वतःचे राजकीय भवितव्य पणाला लावले? असे प्रश्न आता सांगलीकर विचारत आहेत.आता संपूर्ण सांगलीचे लक्ष सोमवारी होणाऱ्या कायदेशीर लढाईकडे लागले आहे. कायद्याच्या या लढाईत शरद पवारांची राष्ट्रवादी बाजी मारणार की भाजपच्या आडोशाला गेलेले दोन्ही नगरसेवक आपले पद वाचवण्यात यशस्वी होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.