माजी विद्यार्थ्यांचे शाळाप्रेम: ५१ वर्षांनंतर एकत्र येत सांगलीच्या सिटी हायस्कूलला दिली दोन लाख 50 हजारहून अधिक निधीतून 'सीसीटीव्ही'ची भेट!
सांगली: आपल्याला घडवणाऱ्या 'शाळा माते'प्रती असलेली कृतज्ञता केवळ शब्दांत व्यक्त न करता, सांगलीतील सिटी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी ती कृतीतून दाखवून दिली आहे. तब्बल ५१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या १९७४ च्या ११ वीच्या बॅचने शाळेच्या सुरक्षिततेसाठी आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी २ लाख ५७ हजार रुपयांचे सीसीटीव्ही (CCTV) युनिट भेट देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. नुकतेच या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले असून, आता संपूर्ण शाळा सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत आली आहे.
५१ वर्षांनंतर आठवणींचा हिंदोळा आणि सामाजिक भान
सन १९७४ मध्ये सिटी हायस्कूलमध्ये ११ वीत शिक्षण घेतलेले ५१ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ५१ वर्षांनंतर स्नेहसंमेलनाच्या (Reunion) निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले होते. या सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत गाणी, नृत्य, मनोरंजन, सत्कार समारंभ आणि स्नेहभोजनाचा आनंद सर्वांनी घेतला. मात्र, या आनंदाच्या क्षणी माजी विद्यार्थ्यांच्या नजरेत एक गोष्ट प्रकर्षाने खटकली, ती म्हणजे एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेची असलेली कमतरता.
आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५ लाखांहून अधिकचा निधी जमा
शाळेची ही गरज ओळखून संमेलन आयोजक शिरीष उकीडवे, वेदवती कुलकर्णी, संजीव खांडेकर, हेमंत पाठक, प्रदीप ताम्हणकर आणि शाळेच्या पर्यवेक्षक प्राची गोडबोले यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेला मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाहता पाहता २ लाख ५७ हजार रुपयांचा कृतज्ञता निधी जमा करण्यात आला आणि हा निधी तात्काळ शाळेचे मुख्याध्यापक मधुकर कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
भावनाक्षत क्षणात फलकाचे अनावरण
गोळा झालेल्या निधीतून अत्यंत आधुनिक अशी सीसीटीव्ही यंत्रणा शाळेत बसवण्यात आली. या यंत्रणेच्या कार्यान्वयनाचा आणि फलक अनावरणाचा मुख्य सोहळा नुकताच पार पडला. शाळेची माजी विद्यार्थिनी वेदवती कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले."माझे वडील डी. एस. कुलकर्णी या शाळेचे नामवंत शिक्षक होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. आज त्यांच्याच वतीने मी या फलकाचे अनावरण करत आहे. यात हात जरी माझे असले, तरी प्रेरणा मात्र माझ्या बाबांचीच आहे."– वेदवती कुलकर्णी (माजी विद्यार्थिनी)
मान्यवरांची उपस्थिती
या कौतुकास्पद आणि प्रेरणादायी सोहळ्यासाठी सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक विजय भिडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, तसेच नंदकुमार बापट, आनंद शिंदे, किरण कुलकर्णी, सुरेश गोडबोले, श्रीमती लता आडकर, श्रीमती सुनीता कुलकर्णी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या अथांग शाळाप्रेमाचे आणि सामाजिक जाणिवेचे संपूर्ण सांगली परिसरातून कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.