Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking!पुण्यात विषारी दारूचे 'तांडव'; १३ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' नरभक्षकांवर मोक्का लावा!

Big Breaking!पुण्यात विषारी दारूचे 'तांडव'; १३ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' नरभक्षकांवर मोक्का लावा!


​प्रशासन ढिम्म, माफिया मोकाट; फुगेवाडी आणि हडपसरमध्ये मृत्यूचे थैमान! आणखी किती निष्पापांचे बळी घेणार?


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी मानवी जीवांशी खेळणाऱ्या हरामखोर दारू माफियांनी पुण्यात विषारी दारूचे उघड तांडव घातले आहे. गेल्या अवघ्या २४ तासांत या जीवघेण्या 'अमृता'मुळे तब्बल १३ निष्पाप नागरिकांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून, पुणेकरांमधून "आता तरी या दारू माफियांचा कायमचा गेम करणार का?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात ६ जणांचा, तर पुण्यातील हडपसर भागात ५ जणांचा या विषारी दारूने बळी घेतला आहे. अजूनही अनेक नागरिक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राहुल शरद क्षीरसागर, विजय शर्मा, पांडुरंग फुगे, विजय राठोड आणि राजेंद्र राठोड अशी मृत्यूमुखी पडलेल्या काही दुर्दैवी नागरिकांची नावे समोर आली आहेत.

​मृत्यूचा 'केमिकल लोचा'; गरिबांच्या पाचवीला पूजलेला मरण सापळा!

​प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. आरोपींनी निव्वळ जास्त नफा कमावण्यासाठी थेट केमिकलयुक्त स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू बाजारात विकायला आणली. ही दारू म्हणजेच थेट 'काळाचा पेला' ठरली! ही दारू पोटात जाताच नागरिकांना तीव्र अस्वस्थता, उलट्या आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. शरीरात विष भिनल्यामुळे अवघ्या काही तासांत १३ जणांचे संसार उद्ध्वस्त झाले.
​जनतेचा संतप्त सवाल: शहराच्या नाकावर टिच्चून हा केमिकलयुक्त मृत्यूचा व्यापार सुरू कसा होता? पोलिसांचे गुप्तहेर खाते आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नक्की काय झोपले होते का? की नेहमीप्रमाणे 'हप्तेखोरी'च्या वरदहस्तामुळे निष्पापांचे बळी गेले?
​मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेसह गँग जेरबंद; पण 'मोक्का' कधी लागणार? या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार आणि नरभक्षक योगेश वानखेडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यासोबत या रॅकेटमधील ६ ते १३ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री यांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, केवळ 'आदेश' आणि 'तपास' या शासकीय सोपस्कारांनी जनतेचा संताप शांत होणार नाही. या सर्व नराधमांवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीच्या खांबापर्यंत खेचण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

​पुण्यात तणाव, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत!
​या सामूहिक हत्याकांडानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हडपसर आणि फुगेवाडी भागात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सध्या पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे, पण "बैल गेला आणि झोपा केला" अशीच या कारवाईची अवस्था आहे. आता जनतेला केवळ आश्वासन नको, तर पुण्यातून हातभट्टी आणि विषारी दारूचे रॅकेट समूळ नष्ट झालेले हवे आहे. या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्या एकाही पापी माणसाला सोडता कामा नये, हीच संपूर्ण महाराष्ट्राची आक्रमक मागणी आहे!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.