राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत बीज भांडवल योजना राबवली जाते. ही योजना गरीब व गरजू कुटुंबांनाआत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवली जाते.
या योजनेसाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. तर पात्र लाभार्थ्यांना ५० हजारांपासून ते ७ लाख रुपयांपर्यंत बँकेमार्फत अर्थसाहाय्य अनुदान किंवा कर्ज स्वरूपात दिले जाते.
या योजनेअंतर्गत एकूण रकमेपैकी २० टक्के रक्कम महामंडळाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते, ५ टक्के रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय, अत्यंत गरजू व्यक्तींसाठी थेट कर्ज योजनाही उपलब्ध आहे, ज्याअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज दिले जाते. या कर्जावर केवळ ४ टक्के व्याज आकारले जाते आणि ३६ महिन्यांत म्हणजेच ३ वर्षांत सहज परतफेड करता येते.
योजनेचा उद्देश
मातंग समाज आणि त्यांच्या बाराही पोटजातींचे जीवनमान उंचावणे, गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना कर्ज व आर्थिक सहाय्य पुरवणे ही या योजनेचा उद्देश आहे.
योजनेचे फायदे
या योजनेमुळे लहान दुकान, शेतीशी जोडलेला व्यवसाय, पशुपालन किंवा इतर छोटे उपक्रम सहज सुरू करता येतील. महामंडळ आणि बँकेच्या सामूहिक मदतीमुळे कर्ज घेणे सोपे आणि सुरक्षित होते. महिला अर्जदारांना कमी व्याजदरामुळे विशेष आर्थिक सवलत मिळते.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेला असावा.)
अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांकडून दिलेला असावा.)
अर्जदाराचा शैक्षणिक दाखला
रेशन कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर
नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट आकाराच्या फोटोच्या दोन प्रती
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेसाठी तीन फोटो आवश्यक
व्यवसाय करावयाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा
व्यवसायाच्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा
विजेचे बिल किंवा भाडेकरार
मातंग समाजाचे जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
बँक पासबुक किंवा खाते क्रमांक व IFSC क्रमांक
व्यवसाय/प्रकल्पासाठी छोटा व्यवसाय आराखडा (अंदाजे खर्च व अपेक्षित उत्पन्नाची माहिती)
व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला
व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल किंवा साहित्य खरेदीचे कोटेशन
एनएसएफडीसी योजनेअंतर्गत वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आरटीओ परवाना
वाहन खरेदीसाठी अधिकृत विक्रेता किंवा कंपनीचे दरपत्रक
स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र
योजनेच्या अटी
अर्जामध्ये खरी व अचूक माहिती देणे आवश्यक आहे; चुकीची माहिती दिल्यास लाभ रद्द होऊ शकतो.लाभार्थ्याने स्वतःचा निश्चित हिस्सा (उदा. ५ टक्के) भरणे आवश्यक आहे.घेतलेले कर्ज वेळेत परत करणे बंधनकारक असून विलंब झाल्यास दंड लागू होऊ शकतो.महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहील.योजनेसोबत प्रशिक्षण असल्यास ते पूर्ण करणे आवश्यक आहे.
योजनेच्या पात्रता
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोटजातींपैकी असावा.
निवडलेल्या व्यवसायाचे आवश्यक ज्ञान व अनुभव अर्जदाराकडे असावा.
केंद्रीय महामंडळाच्या योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ९८ हजार रुपयांपेक्षा कमी, तर शहरी भागातील अर्जदाराचे उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
राज्य शासनाच्या योजनांसाठी ग्रामीण व शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराने यापूर्वी या महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
अर्ज प्रक्रिया
प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://slasdc.org/ किंवा जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेचा अर्ज फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करा किंवा कार्यालयातून घ्यावा.आवश्यक कागदपत्रे जमा करून अर्ज काळजीपूर्वक व पूर्ण माहितींसह भरावी.व्यवसाय सुरू करायचा असल्यास अंदाजे खर्च व अपेक्षित उत्पन्नाचा साधा व्यवसाय आराखडा जोडावा.आवश्यक असल्यास ग्रामपंचायत अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींची शिफारस घ्यावी.ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत; अन्यथा कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावीत.अर्ज सादर केल्यानंतर मिळालेला संदर्भ क्रमांक जतन करून ठेवावा.अर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेशी संपर्क साधून कर्ज करार व परतफेडीचे वेळापत्रक निश्चित करावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.