Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"शिकारीच झाले शिकार! 'ती' एकटी होती म्हणून छेडायला आले, पण समोर 'लेडी सिंघम' असल्याचं कळताच ४० जणांचे धाबे दणाणले."

"शिकारीच झाले शिकार! 'ती' एकटी होती म्हणून छेडायला आले, पण समोर 'लेडी सिंघम' असल्याचं कळताच ४० जणांचे धाबे दणाणले."


महिलांच्या सुरक्षेचे दावे अनेकदा कागदावरच राहतात, पण ते प्रत्यक्ष जमिनीवर किती खरे आहेत हे तपासण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त सुमती यांनी एक अत्यंत अनोखा प्रयोग केला.

साध्या वेशात, सुरक्षारक्षकांशिवाय मध्यरात्री रस्त्यावर पोलीस आयुक्त सुमती उभा राहिल्या. अवघ्या तीन तासांत ४० पुरुषांनी गाठले. या प्रकारामुळे शहरात महिला किती असुरक्षित आहेत, याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त सुमती यांनी शहरातील ग्राउंड रिअॅलिटी तपासण्याचे ठरवले. मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या वेळेत त्या एका बस स्थानकावर सामान्य महिलेसारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या आसपास कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. केवळ तीन तासांच्या या काळात तब्बल ४० पुरुषांनी त्यांना गाठून त्रास देण्याचा प्रयत्न केला.

यात धक्कादायक बाब म्हणजे, हे पुरुष केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते, तर त्यात शिकलेले तरुण, विद्यार्थी आणि नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही होते. यातील अनेक जण दारूच्या नशेत होते, तर काही जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय आहे. समोर उभी असलेली स्त्री ही एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, याची कल्पनाही त्यांना नव्हती.

तात्काळ कारवाई आणि समुपदेशन

या मोहिमेनंतर पोलिसांनी या सर्व ४० व्यक्तींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, तातडीने गुन्हे दाखल न करता पोलीस प्रशासनाने एक वेगळा मार्ग निवडला. या सर्वांना त्यांच्या कुटुंबीयांसमक्ष बोलावून त्यांचे कडक शब्दांत समुपदेशन करण्यात आले. "सार्वजनिक ठिकाणी महिलांशी कसे वागावे," याचे धडे देत त्यांना अंतिम चेतावणी देण्यात आली.

अनुभवी 'फील्ड ऑफिसर'

आयुक्त सुमती यांच्यासाठी असा प्रयोग ही पहिलीच वेळ नाही. २५ वर्षांपूर्वी, आपल्या करिअरच्या सुरुवातीला काझीपेट रेल्वे स्थानकाजवळही त्यांनी अशाच प्रकारे 'अंडरकव्हर' राहून महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. तेलंगणा केडरच्या या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने यापूर्वी राज्य गुप्तचर विभाग (SIB) आणि माओवाद्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मलकाजगिरीच्या महिलांनी या मोहिमेचे मोठे कौतुक केले असून, "असे अधिकारी असतील तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल," अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. समाज माध्यमांवर सुध्दा मोठ्या प्रमाणात नेटकर्‍यांकडून कौतुकास्पद प्रतिक्रिया येत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.