"थलापती"ची प्रतीक्षा वाढली! विजयचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांनी रोखला; बहुमताचा आकडा सिद्ध करण्याचा सल्ला
तामिळनाडु विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर थलपती विजयकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. बुधवारी विजयने तामिळनाडुचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
विजयने आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं सांगत हा दावा केला आहे. मात्र पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांना विजयचा पक्ष बहुमत मिळवू शकेल असा विश्वास नाहीय.
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाताना थलपती विजयकडे फक्त ११२ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र होतं. त्यांना बहुमतासाठी ११८ जणांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे राज्यपालांनी थलपती विजयला ११८ सह्या घेऊन परत या असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
टीव्हीकेने काँग्रेसशिवाय डीएमकेचा सहकारी पक्ष असलेल्या व्हिसीके, डावे पक्ष, इंडियन यूनियन मुस्लिम लीग यांच्याकडेही पाठिंबा मागितला होता. काँग्रेसने होकार दिला असला तरी डावे पक्ष आणि आययुएमएलने पाठिंब्याला नकार दिलाय. तर व्हिसीकेनं निर्णय घेतलेला नाही. टीव्हीकेला १०८, डीएमकेला ५९, एआयडीएमकेला ४७, काँग्रेसला ५, पीएमकेला ४ तर आययूएमएलला २ जागा मिळाल्यात. तर भाजप, एएमएमके, डीएमडीके यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
विजयने डीएमके, एआयडीएमके आणि भाजप वगळता इतर सर्व पक्षांकडे पाठिंब्यासाठी विनंती केली होती. मात्र फक्त काँग्रेसनेच थेट पाठिंबा दिला आहे. सध्या काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. काँग्रेसने पाठिंबा दिला तरी टीव्हीकेकडे ११२ आकडा होईल. त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी ६ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. यासाठी त्यांना इतर लहान पक्षांची मदत लागणार आहे. ती मदत मिळवण्याचाच पेच विजयसमोर असणार आहे.
तामिळनाडु विधानसभेत २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. तर टीव्हीकेने विधानसभेत १०८ जागा जिंकल्या. मात्र यापैकी दोन जागांवर विजय निवडून आलाय. आता त्यापैकी एका जागेवर त्याला राजीनामा द्यावा लागेल. म्हणजेच पुन्हा एक जागा कमी होऊन १०७ जागा विजयच्या टीव्हीके पक्षाकडे असतील. त्यामुळे बहुमत मिळवायचे असेल तर इतर पक्षांची साथ मिळवावी लागेल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.