पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'; सुवेंदू अधिकारी नव्हे, 'हे' महिला नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप ने 207 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर टीएमसी ला 80 जागांवर समाधान मानावे लागले आणि काँग्रेस फक्त 2 जागांवर मर्यादीत राहिली. या पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाच्या हातात जाणार, आणि या शर्यतीत सर्वात आघाडीवर नाव आहे ते अग्निमित्र पॉल यांचे. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता स्थापन होण्याची शक्यता असून दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे.
फॅशन डिझायनर ते राजकारणी असा प्रवास
अग्निमित्रा पॉल या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष असून पश्चिम बंगाल विधानसभेतील आसनसोल दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या कोलकात्यातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि उद्योजिका होत्या. त्यांचा 'Inga' हा फॅशन ब्रँड खूप लोकप्रिय होता. त्यांनी 'कोई मेरे दिल से पूछे' आणि 'वाया दार्जिलिंग' सारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठीही वेशभूषा डिझाइन केली आहे.
पार्श्वभूमी
25 नोव्हेंबर 1974 रोजी जन्मलेल्या अग्निमित्रा पॉल या बालरोगतज्ज्ञ डॉ. अशोक रॉय यांच्या कन्या आहेत. त्यांनी बॉटनी विषयात पदवी घेतल्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स अँड मॅनेजमेंट सायन्सेस येथून फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला. तसेच TDB कॉलेजमधून MBA पदवी मिळवली.
सेलिब्रिटींसाठी डिझायनिंग
फॅशन क्षेत्रात त्यांनी श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, काय के मेनन, ईशा देओल, विनय पाठक आणि सोनाली कुलकर्णी यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांसाठी कॉस्च्युम आणि पर्सनल वॉर्डरोब डिझाइन केले आहेत.
राजकारणातील प्रवेश आणि वाटचाल
अग्निमित्रा पॉल यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले.त्या एक आक्रमक आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 2021 मध्ये त्यांनी टीएमसीच्या उमेदवार सायोनी घोष यांचा पराभव करून पहिल्यांदाच पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश केला होता. आता भाजपच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर अग्निमित्रा पॉल मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीच्या दावेदार मानल्या जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.