Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सांगली मिरज-कुपवाडची जनता पुराच्या दाढेत? अधिकाऱ्यांच्या 'घोळामुळे' नालेसफाई रखडली; ठेकेदारांचे मनपात हेलपाटे!

Breaking News! सांगली मिरज-कुपवाडची जनता पुराच्या दाढेत? अधिकाऱ्यांच्या 'घोळामुळे' नालेसफाई रखडली; ठेकेदारांचे मनपात हेलपाटे!


सांगली-मिरज आणि कुपवाड शहर यंदा पावसाळ्यात जलमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे मान्सून अंदमानात वेळेआधीच दाखल झाला असताना, दुसरीकडे महापालिकेतील ढिम्म प्रशासन अजूनही 'निविदा' प्रक्रियेच्या खेळात अडकले आहे. तब्बल ६५ नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ५० दिवसांचा कालावधी लागत असताना, मे महिना संपत आला तरी कामाला सुरुवात झालेली नाही. या बेजबाबदारपणामुळे यंदा सांगलीकरांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​निविदेचा पत्ता नाही, ठेकेदारांचे हेलपाटे
दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणारी नालेसफाई यंदा मे महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी कागदावरच आहे. स्थायी समितीच्या सभेत या विषयावर प्रशासन पूर्णपणे उघडे पडले आहे. अद्याप नालेसफाईची निविदाच प्रसिद्ध न झाल्याचे धक्कादायक स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मंगळवारी दिवसभर ठेकेदार निविदेच्या प्रतीक्षेत महापालिकेत घिरट्या घालत होते, मात्र अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
​भ्रष्टाचाराच्या भीतीने काम रोखले?

गेल्या काही वर्षांत नालेसफाईच्या कामात मोठा घोळ झाल्याच्या तक्रारी आहेत. एकाच ठेकेदाराला दोनदा बिले देणे, काम न करताच पैसे लाटणे अशा प्रकारांमुळे यंदा अधिकारी 'ताकही फुंकून प्यायचे' नाटक करत आहेत. मात्र, या सावधगिरीच्या नादात शहराचे आरोग्य आणि सुरक्षितता वाऱ्यावर सोडली गेली आहे. ६५ मोठ्या नाल्यांची सफाई व्हायला किमान दोन महिने लागतात, आता पाऊस काही दिवसांवर असताना हे काम पूर्ण होणे केवळ अशक्य असल्याचे खुद्द वरिष्ठ अधिकारी खासगीत मान्य करत आहेत.

​नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण
प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचे ऐकून घेतले जात नसल्याचा सूर नगरसेवकांमध्ये आहे. जर नाले वेळेत साफ झाले नाहीत, तर पावसाळ्यात नाले तुंबून रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी साचणार हे निश्चित आहे. यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
एकूण नाले: ६५
​काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ: ५० दिवस
​सद्यस्थिती: निविदा प्रक्रिया अद्याप प्रलंबित.
​परिणाम: मान्सून लवकर येणार असल्याने शहरात पाणी साचण्याची दाट शक्यता.

​प्रशासनाचा 'गेंड्याचा कातडी' स्वभाव यंदा सांगलीकरांना महागात पडणार, अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.