Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कलिंगड नव्हे, 'काळ'च खाल्ला! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; मेंदू अन् हृदयही पडले हिरवे

कलिंगड नव्हे, 'काळ'च खाल्ला! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; मेंदू अन् हृदयही पडले हिरवे

मुंबई: पायधुनी येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने मुंबई हादरली होती. कलिंगड खाल्ल्याने ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे, त्याने तपास करणाऱ्या पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

मृतांच्या अंतर्गत अवयवांचा रंग बदलून तो चक्क हिरवा झाला असून शरीरात एका शक्तिशाली औषधाचे अंश सापडले आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतर आता या प्रकरणाच्या तपासाची चक्रे पूर्णपणे फिरण्याची शक्यता आहे. चारही मृतांच्या शरीरात एक धक्कादायक घटक सापडला आहे.
अवयव पडले हिरवे, डॉक्टरही चक्रावले


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना आणखी एक विदारक दृश्य पाहायला मिळाले. मृतांचे मेंदू, हृदय आणि आतडी चक्क हिरवी पडली होती. सामान्य विषबाधेत शरीरात असा बदल सहसा दिसत नाही. डॉक्टरांच्या मते, हा एखाद्या अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो, ज्याने संपूर्ण शरीरात शिरकाव केला होता. या फॉरेन्सिक रिपोर्टवर डॉक्टरांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.
शरीरात सापडला हा धक्कादायक पदार्थ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात 'मॉर्फिन' (Morphine) या शक्तिशाली वेदनाशामक औषधाचे अंश सापडले आहेत. मॉर्फिन हे सहसा कॅन्सरसारख्या आजारात किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या शरीरात हे औषध आले कुठून? आणि त्याचा कलिंगडाशी काय संबंध? या प्रश्नांनी पोलिसांची झोप उडवली आहे.

सुरुवातीला या कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याचे समोर आले होते. मात्र, आता मॉर्फिनचा शोध लागल्याने हा केवळ अपघात आहे की घातपात? याचा संशय बळावला आहे. पोलीस आता त्या कलिंगड विक्रेत्यापासून ते कुटुंबाच्या औषधोपचाराच्या इतिहासापर्यंत सर्व बाजू तपासत आहेत.

मार्फिन म्हणजे काय?

मॉर्फीन हे एक अत्यंत शक्तिशाली वेदनाशामक औषध आहे, जे प्रामुख्याने तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. हे औषध 'ओपिओइड ऍनाल्जेसिक' (Opioid Analgesics) किंवा 'नार्कोटिक्स' (Narcotics) या वर्गात येते. मॉर्फीन हे अफूच्या झाडाच्या (Papaver somniferum) बियांपासून किंवा लेटेक्सपासून तयार केले जाते. जेव्हा इतर वेदनाशामक औषधे (उदा. पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन) वेदना कमी करण्यास अपयशी ठरतात, तेव्हा डॉक्टर मॉर्फीनचा सल्ला देतात. हे थेट मध्यवर्ती मज्जासंस्थेवर (Central Nervous System - CNS) कार्य करते. मेंदू आणि मज्जासंस्थेला वेदनेचे संकेत मिळण्यापासून थांबवते आणि वेदनेबद्दलची संवेदना बदलते. मॉर्फीनचा गैरवापर रोखण्यासाठी कडक नियम आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.