Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत थरारक थरार! ४५ मिनिटे फिल्मी स्टाईल पाठलाग करून तब्बल ४२ लाखांच्या गांजासह आंतरजिल्हा तस्कर गजाआड!

सांगलीत थरारक थरार! ४५ मिनिटे फिल्मी स्टाईल पाठलाग करून तब्बल ४२ लाखांच्या गांजासह आंतरजिल्हा तस्कर गजाआड!


४७८ किलो गांजा प्रकरणात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला कुपवाड पोलिसांनी घातल्या बेड्या; ओडिसा ते सांगली कनेक्शन उघड!


​सांगली: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका आंतरजिल्हा गांजा तस्कराचा तब्बल ४५ मिनिटे फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून १३४ किलोग्रॅम गांजा, एक बिना नंबरची इनोव्हा गाडी, मोबाईल फोन आणि डोंगल असा एकूण ४२,६३,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​पकडण्यात आलेला आरोपी विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भिमनगर, पिंपळी रोड, जालोची, ता. बारामती, जि. पुणे) हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, पुणे ग्रामीणमधील बारामती शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तब्बल ४७८ किलो ग्रॅम गांजाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा असलेला मुख्य फरार आरोपी होता.

​असा रंगला पोलिसांचा थरारक 'चेस गेम'
बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री १८:३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार संदीप नलावडे आणि सागर लवटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक पक्की माहिती मिळाली. बारामती येथील एक सराईत तस्कर एका सोनेरी रंगाच्या, बिना नंबर प्लेटच्या इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन तासगावमार्गे सांगलीच्या दिशेने येत असल्याची ती बातमी होती. माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) लहू थाटे आणि त्यांच्या पथकाने तातडीने कवलापूर येथे सापळा रचला.
काही वेळातच संशयित इनोव्हा कार भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहताच चालकाने कारचा वेग वाढवून तिथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता खाजगी वाहने आणि मोटारसायकलवरून त्या कारचा थरारक पाठलाग सुरू केला.
​गल्लीबोळातून भरधाव पळ काढली कार!

संशयित चालक पकडले जाण्याच्या भीतीने कार माधव नगर, संजय नगर, अहिल्या नगर आणि रामरहीम कॉलनीच्या अरुंद गल्लीबोळातून मिळेल त्या वाटेने अत्यंत धोकादायक रीतीने पळवत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एलसीबी पथकाने तातडीने संजय नगर आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्याला सतर्क केले. अखेर ४५ मिनिटांच्या अंगावर काटा आणणाऱ्या पाठलागानंतर, जुना जकात नाका कुपवाड चौकात पोलिसांनी चहुबाजूंनी वेढा टाकून संशयित इनोव्हा कारला अडवले आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विकी कांबळेला शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले.

​डिकी उघडताच पोलिसांचे डोळे पांढरे; ओडिसा ते सांगली ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश!

सपोनि लहू थाटे यांनी पंचांसमक्ष इनोव्हा कारची तपासणी केली असता, कारच्या मागच्या डिकीमध्ये खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले ६६ पॅकेट्स आणि निळ्या रंगाच्या पिशव्या आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्या असता त्यात १३४ किलो ग्रॅम वजनाचा काळपट हिरवट रंगाचा फुलबोंडे असलेला उच्च दर्जाचा तयार गांजा सापडला.

​सुरुवातीला आरोपी विकी कांबळे याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली आणि या आंतरराज्य ड्रग रॅकेटचा खुलासा केला:
​मुख्य सूत्रधार (पुणे): त्याचा मित्र चंदनसिंग (रा. पुणे) याने गांजा आणण्यासाठी पैसे दिले होते.

​ओडिसा कनेक्शन: हा गांजा ओडिसा राज्यातील बरगट (जि. संभलपूर) येथील 'जॉकी' नावाच्या ड्रग्ज माफियाकडून खरेदी करण्यात आला होता.

​सांगलीतील खरेदीदार: हा गांजा सांगलीतील हरीपूर येथे राहणाऱ्या पप्पू फाकडे याने मागवला होता. बारामतीमधून मायणी-विटा-तासगाव मार्गे तो सांगलीत सप्लाय करण्यासाठी येत होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण: ४२,६३,५००/- रुपये)

अनुक्रम मुद्देमालाचा तपशील अंदाजे किंमत (रु.)
१. १३४ किलो ग्रॅम तयार गांजा (६६ पॅकेट्स) ३३,५०,०००/-
२. सोनेरी रंगाची टोयोटा इनोव्हा कार (बिना नंबरची) ९,००,०००/-
३. मोटोरोला (Moto) G35 मॉडेल मोबाईल १०,०००/-
४. अ‍ॅमेझॉन बेसिक कंपनीचे वायरलेस डोंगल २,०००/-
५. जिओ भारत की-पॅड मोबाईल १,५००/-

पोलीस दलाची मोठी कामगिरी

सदरची धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि लहू थाटे, एमआयडीसी कुपवाडचे सपोनि आनंदराव घाडगे, पुणे ग्रामीणचे सपोनि कुलदीप संकपाळ, श्रेणी पीएसआय बाळासाहेब कारंडे तसेच सांगली एलसीबी, एमआयडीसी कुपवाड, पुणे ग्रामीण आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी (संदीप नलावडे, सागर लवटे, निलेश कोळेकर, राजू मोमीन, विजय पाटणकर व इतर सहकारी) महत्त्वाची भूमिका बजावली.

​याप्रकरणी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) चे कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा रजि. नंबर १२४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि आनंदराव घाडगे करत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सांगली आणि पुणे परिसरातील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.