नशिबाची साथ की कष्टाची जोड? देवळ्यातील जुळ्या भावांचा 'सेम टू सेम' करिश्मा; गुणांचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
देवळा: तालुक्यातील श्रीपुरवडे येथील जुळी भावंडे प्रणित आणि प्रणव तुषार पाटील यांनी दहावीच्या निकालात आपण एकमेकांची 'कार्बन कॉपी' असल्याचे सिद्ध केले. यंदा जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेच्या निकालात दोघांनाही तंतोतंत ९६ टक्के गुण मिळाले. विशेष म्हणजे हिंदी आणि गणित या विषयांतही दोघांचे गुण अगदी समान आहेत.
दिसण्यात सारखे असलेले प्रणित आणि प्रणव यांनी अभ्यासातही एकमेकांचे प्रतिबिंब असल्याचे सिद्ध केले. दोघेही एकत्र अभ्यास करत, एकमेकांच्या शंका सोडवत आणि समान वेळापत्रक पाळत तयारी करीत असत. निकालातही अशीच 'कार्बन कॉपी' दिसल्याने कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल बोलताना प्रणित आणि प्रणव यांनी सांगितले की, आम्ही दोघांनी नेहमी एकत्र अभ्यास केला. एकमेकांना समजावून सांगत तयारी केली; मात्र गुणही अगदी सारखेच मिळतील, असे वाटले नव्हते. हा निकाल आमच्या नात्याची खास पावती आहे. पालक तुषार पाटील आणि रोशनी पाटील यांनी सांगितले की, मुलांवर कधीही एकमेकांपेक्षा जास्त गुण मिळवण्याचा दबाव आम्ही टाकला नाही. स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना त्यांनी जपली. या अनोख्या निकालाची चर्चा आता सोशल मीडियावरही रंगली असून, नेटकऱ्यांकडून जुळ्या भावंडांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.