Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हादरली! ५० तोळे सोनं अन् 'वंशाच्या दिव्या'साठी विवाहितेचा संशयास्पद बळी; ४ दिवस उलटले तरी अंत्यसंस्कार रखडले!

सांगली हादरली! ५० तोळे सोनं अन् 'वंशाच्या दिव्या'साठी विवाहितेचा संशयास्पद बळी; ४ दिवस उलटले तरी अंत्यसंस्कार रखडले!


सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पलूस येथील विवाहितेचा तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी आता हुंडा आणि वंशाला मुलगा पाहिजे, यासाठी छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. पलूसमध्ये या महिलेचा मृतदेह आणण्यात आला आहे. मात्र चार दिवसापासून अंत्यसंस्कार रखडले आहे.

पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, पलूस येथील माहेर असलेल्या आरती प्रशांत जाधव (वय ३३) असं मयत विवाहितेचं नाव आहे. तामिळनाडू मधून मृत महिलेचे पार्थिव सध्या पलूस ग्रामीण रुग्णालयमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?
शनिवारी सकाळी आरतीच्या मृत्यूबाबत बनाव सासरच्यांनी रचला, मात्र माहेरच्यांना थेट माहिती न देता तेथील स्थानिक सुवर्णकारांना फोन करून परस्पर शवविच्छेदन करण्याची भाषा वापरल्याने संशय बळावला आहे. पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि मामा यांच्यासह ६ जणांनी मिळून छळ करत आरतीचा जीव घेतल्याचा थेट आरोप तिच्या भावाने केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरतीच्या कुटुंबीयांनी केली असून, पलूस परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, चार दिवस उलटून गेले तरी मृत महिलेवर अंत्यसंस्कार न झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चाललं आहे. वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी तीन वेळा गर्भपात पाडण्यास भाग पाडणे आणि सोन्याच्या हुंड्यासाठी सासरच्यांकडून तिचा अमानुष छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
मुलाच्या हवासपोट्या छळ

आरतीचा विवाह २०११ मध्ये नागापटनम येथील सुवर्ण व्यावसायिक प्रशांत आनंदराव जाधव यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दोन मुली झाल्याने 'मुलगाच हवा' या हव्यासापोटी सासरच्यांनी तिच्यावर सतत दबाव आणला. डॉक्टरांनी पुन्हा गरोदर राहिल्यास जीवाला धोका असल्याचा इशारा दिलेला असतानाही तिच्यावर अत्याचार सुरूच होते. तसंच माहेरून एकूण ५० तोळे सोन्याची मागणी करत उर्वरित सोन्यासाठी ६ वर्षांपासून तिला माहेरच्यांशी संपर्कही करू दिला नव्हता. फिर्यादी सुभाष बळवंत कदम (वय ७४,) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मुलगी आरती प्रशांत जाधव (वय ३७) हिचा विवाह प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर आरती ही पतीसह नागपट्टीनम (राज्य - तामिळनाडू) इथं राहत होती. मात्र, फेब्रुवारी २०१५ पासून ते दिनांक २३ मे २०२६ पर्यंत आरोपींकडून तिचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, "तुला मुलगा होत नाही" तसंच "माहेरहून सोने आण" या कारणांवरून आरोपींकडून आरती हिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू होते. विशेषतः पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी हाताने मारहाण करून तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आरती हिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस आरोपीच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

पुढील तपास तामिळनाडू पोलिसांकडे
या प्रकरणी आरोपी म्हणून प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश जोतिराम साळुंखे, प्रतिक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा २६ मे २०२६ रोजी नोंदविण्यात आला. गुन्हा तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम इथं घडलेला असल्याने पुढील तपासासाठी तो नागपट्टीनम सिटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादी हे पलूस येथील रहिवासी असून तामिळनाडूमध्ये भाषेची अडचण आणि इतर कारणांमुळे तक्रार नोंदविण्यात अडचणी येत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो नागपट्टीनम सिटी पोलिसांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सद्यस्थितीत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.