Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"१०० एकरात विवाह सोहळा! इंदुरीकर महाराजांचे जावई आहेत तरी कोण? वाचा मुंबईच्या या बड्या उद्योजकाची गोष्ट."

"१०० एकरात विवाह सोहळा! इंदुरीकर महाराजांचे जावई आहेत तरी कोण? वाचा मुंबईच्या या बड्या उद्योजकाची गोष्ट."


अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्यानंतर आज ३ मे रोजी संगमनेर तालुक्यात भव्य विवाह सोहळा पार पडत असून, या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

शाही साखरपुड्यानंतर भव्य विवाह सोहळ्याची तयारी
गेल्या वर्षी झालेल्या साखरपुड्यानेच या विवाहाची झलक दिली होती. आता त्याहूनही भव्य पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात हा सोहळा पार पडत असून, राज्यभरातून मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

समाजप्रबोधनातून लोकप्रिय झालेले इंदुरीकर महाराज
निवृत्ती देशमुख हे आपल्या खास शैलीतील कीर्तनांमुळे नेहमीच चर्चेत असतात. समाजातील विविध प्रश्नांवर ते विनोदी आणि प्रभावी भाषेत भाष्य करतात.शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद, लग्नसंस्था यांसारखे विषय ते आपल्या कीर्तनातून मांडत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत.

१०० एकर परिसरात भव्य आयोजन
इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह गुंजाळवाडी शिवारात होत असून, यासाठी तब्बल १०० एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी लाखो लोक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरत आहे.

इंदुरीकर महाराजांचे जावई कोण?
इंदुरीकर महाराजांच्या जावयाचे नाव साहिल चिलप असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहेत. ते उच्च शिक्षित असून त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. तसेच त्यांचा वडिलोपार्जित वाहन व्यवसायही आहे आणि त्यांच्या मालकीच्या अनेक गाड्या असल्याचे सांगितले जाते. मुंबईतही त्यांचा बांधकाम व्यवसाय विस्तारलेला आहे.

विवाहासोबत धार्मिक कार्यक्रमांची जोड
या भव्य विवाह सोहळ्याला धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. विवाहाच्या दिवशीच त्याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कोण कोण उपस्थित राहणार?
या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय विविध संत-महंतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

जेवणाचा मेन्यू काय आहे?

लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची उपस्थिती लक्षात घेता, जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने करण्यात आली आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी असणार आहे. मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, चौपाटी, डाळ भात, पुरी, मटकी या जेवणाचा समावेश असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.