Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य उत्पादन शुल्क विभागातील 'अदृश्य भ्रष्टाचाराचा' महामेरू: प्रवीण अण्णांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याची धक्कादायक कहाणी!​

राज्य उत्पादन शुल्क विभागातील 'अदृश्य भ्रष्टाचाराचा' महामेरू: प्रवीण अण्णांच्या कोट्यवधींच्या साम्राज्याची धक्कादायक कहाणी!


सांगली : सरकारी कार्यालयांमध्ये अधिकृत कर्मचाऱ्यांपेक्षा 'झिरो' (खाजगी एजंट) लोकांचा वावर किती घातक ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रवीण अण्णा! २०१६ पासून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पाय रोवलेल्या या व्यक्तीने आजमितीला कोट्यवधींची माया जमवली असून, सरकारी यंत्रणेच्या समांतर आपली स्वतःची एक भ्रष्ट यंत्रणा उभी केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

​'झिरो' ते 'किंगमेकर': असा झाला प्रवास

प्रवीण अण्णांचा या कार्यालयातील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आहे. सुरुवातीच्या काळात केवळ किरकोळ कामांसाठी कार्यालयात घुटमळणाऱ्या अण्णांनी हळूहळू विभागातील सर्व कायदेशीर पळवाटा आणि खाचाखोचांचा सखोल अभ्यास केला. कर्मचाऱ्यांच्या विश्वासात राहून त्यांनी कार्यालयातील फाईल्स आणि परवाना प्रक्रियेवर आपली पकड मजबूत केली. एकेकाळी साधे 'झिरो' म्हणून काम करणाऱ्या अण्णांनी नंतर संपूर्ण कार्यालयालाच आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली.

​गुरूवरच उलटला चेला!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच कार्यालयातील एका जुन्या 'झिरो'ने अण्णांना या कामातील बारकावे शिकवले होते. मात्र, कालांतराने अण्णांच्या महत्त्वाकांक्षेने मर्यादा ओलांडल्या. कार्यालयातील वर्चस्वावरून जुन्या सहकाऱ्याशी खटके उडू लागल्यानंतर अण्णांनी हुशारीने आपले बस्तान कार्यालयाबाहेर हलवले. मात्र, बाहेर राहूनही त्यांनी आपली यंत्रणा अशी काही राबवली की, प्रत्यक्ष अधिकारीही त्यांच्यापुढे हतबल झाले. ज्या गुरूंनी त्यांना हे काम शिकवले, त्यांनाही मागे टाकत अण्णांनी कोट्यवधींची झेप घेतली.
​परवानाधारकांचे जाळे आणि वसुलीचा अड्डा

प्रवीण अण्णांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही, तर अनेक परवानाधारकांना (Liquor License Holders) आपल्या विश्वासात घेतले आहे. नवीन परवाना मिळवून देणे असो किंवा जुन्या परवान्यातील त्रुटी दूर करणे, अण्णांचा शब्द या विभागात अंतिम मानला जाऊ लागला. या 'मध्यस्थी'च्या माध्यमातून अण्णांनी २०१६ पासून आजपर्यंत बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असून, या कमाईचा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

​प्रशासनाचे मौन की अभय?
एकीकडे सामान्य माणूस सरकारी कामासाठी हेलपाटे मारत असताना, दुसरीकडे प्रवीण अण्णांसारखी खाजगी माणसे सरकारी कार्यालयात समांतर प्रशासन चालवत आहेत. २०१६ पासून राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली? अण्णांच्या या कमाईत आणखी कोणाकोणाचे वाटे आहेत? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. ​आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन प्रवीण अण्णांच्या बेकायदेशीर साम्राज्याला चाप बसणार की 'अण्णांची ही वारी' अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश.....



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.