Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रमोशन नको, डिमोशन द्या! दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाची अजब मागणी; पुन्हा 'शिपाई' पदावर नियुक्ती

प्रमोशन नको, डिमोशन द्या! दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाची अजब मागणी; पुन्हा 'शिपाई' पदावर नियुक्ती


नवी दिल्ली: उत्तर पूर्व जिल्ह्यातील करावल पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका उपनिरीक्षकाने डिमोशनची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष यांनी स्वेच्छेने पदावनतीची विनंती केली होती आणि आता डीसीपींनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना पुन्हा कॉन्स्टेबल बनवण्यात आले आहे. 

मनीष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन देत म्हटलं की, मला उपनिरीक्षक पदावर काम करण्यास रस नाही. मला पुन्हा कॉन्स्टेबल बनवावे अशी मागणी केली. या अनोख्या मागणीने सगळेच त्याची चर्चा करू लागले. मनीष यांच्या मागणीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी मनीष यांची पडताळणी करण्यात आली. ज्यात त्यांच्याविरोधात कुठलीही विभागीय, गुन्हेगारी अथवा देखरेख समितीचा खटला प्रलंबित आहे का हे पाहिले गेले. त्यानंतर उपायुक्त यांनी मनीष यांचा अर्ज स्वीकारत त्यांना कॉन्स्टेबल बनवले. 

माहितीनुसार, मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक कॉन्स्टेबल म्हणूनच केली होती. त्यानंतर विभागीय परीक्षा देत ते उपनिरीक्षकपदापर्यंत पोहचले. परंतु प्रमोशननंतर वाढत्या जबाबदाऱ्या आणि व्यस्तता यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. मनीष यांना शिक्षणात खूप रस होता. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. उपनिरीक्षक पदामुळे मिळणारा कमी वेळ अभ्यासासाठी पुरेसा नाही. त्यामुळे पुन्हा कॉन्स्टेबल बनून ते अभ्यासासाठी जास्त वेळ देऊ इच्छितात असं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले.

मनीष २०१८ साली पोलीस खात्यात भरती झाले होते. तेव्हापासून ते विविध परीक्षांची तयारी करत आहे. २०२३ साली दिल्ली पोलिसांच्या विभागीय परीक्षेत त्यांनी यश मिळवले त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यावर मनीष करावल येथे उपनिरीक्षक म्हणून काम पाहू लागले. नव्या नियमानुसार उपनिरीक्षकांना त्यांच्या सेवा काळात ६-७ जिल्ह्यात काम करणे बंधनकारक असते. त्यात मनीष यांनी अभ्यासासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डिमोशन करण्याची विनंती केली. त्यानंतर ही विनंती मान्य करत मनीष यांना पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.