मिरजेनंतर आता सांगलीतही 'उत्पादन शुल्क'चा गांधारी अवतार! 'सुरेश' पाठोपाठ चांदणी चौकातील 'डायमंड परमिट रूम'मध्ये उघड 'वाईन शॉप' पॅटर्न; 'प्रवीण अण्णां'चा वरदहस्त?
सांगली : राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारा सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या भ्रष्टाचाराच्या आणि संशयास्पद कारभाराच्या चिखलात रुतला आहे. मिरजेत कार्यालयाच्या नाकाखाली सुरू असलेल्या 'सुरेश परमिट रूम'चा काळा कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच, आता थेट सांगलीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चांदणी चौक परिसरातील 'डायमंड परमिट रूम'नेही नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परमिट रूमच्या नावाखाली चक्क बेकायदेशीर 'वाईन शॉप' थाटून ग्राहकांची आणि शासनाची लूट सुरू असतानाही, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र 'अंधारी' टोपी घालून गप्प का बसलेत? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
चांदणी चौकात 'डायमंड'चा उघड दरोडा; परमिट रूम की दारूचा बेकायदा अड्डा?
नियमानुसार परमिट रूममध्ये दारूची काउंटरवरून थेट विक्री (Takeaway) किंवा वाईन शॉपसारखी उघड मांडणी करण्यास सक्त मनाई आहे. परंतु, चांदणी चौक परिसरातील 'डायमंड परमिट रूम'मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून थेट वाईन शॉपसारखाच बेकायदा बिझनेस पॅटर्न राबवला जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा सगळा प्रकार शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी उघडपणे सुरू आहे. 'सुरेश' आणि 'डायमंड' या दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीची बेकायदेशीर कार्यपद्धती पाहायला मिळत असल्याने, या दोन्ही बड्या असामींना उत्पादन शुल्क विभागातील कोणत्या मोठ्या साहेबाची 'आर्थिक' मूकसंमती लाभली आहे? याचे उत्तर देण्यास विभाग सध्या टाळाटाळ करत आहे.
नियम वाकवण्यात तरबेज 'प्रवीण अण्णा'; 'डायमंड'च्या प्रस्तावामागेही तोच सुत्रधार?
मिरज आणि सांगलीच्या या संपूर्ण काळ्याबेऱ्यात सध्या एकाच नावाचा डंका ऐकायला मिळतोय, तो म्हणजे पडद्यामागील सुत्रधार 'प्रवीण अण्णा'! शासकीय नियमांना केराची टोपली दाखवून, वाट्टेल तसे कायदेशीर 'प्रस्ताव' तयार करण्यात आणि ते वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्यात हे 'अण्णा' कमालीचे तरबेज असल्याचे बोलले जाते. मिरजेच्या सुरेश परमिट रूम पाठोपाठ, सांगलीच्या डायमंड परमिट रूमला लाभलेल्या या 'अवैध' रूपांतरामागेही याच प्रवीण अण्णांची कूटनीती आणि कृपादृष्टी असल्याचा संशय आता बळावला आहे. या अण्णांचा वरदहस्त असल्याशिवाय अधिकारी इतके आंधळे होऊच शकत नाहीत, अशी चर्चा आता व्यावसायिक वर्तुळात रंगली आहे.
प्रामाणिक व्यावसायिक कचाट्यात, 'डायमंड'सारखे काळे धंदे बोकाळले; कारवाई कधी?
एकही नियम न पाळता बेकायदेशीरपणे परमिट रूम चालवून 'डायमंड' आणि 'सुरेश' सारखे चालक शासनाच्या अधिकृत महसुलाला दररोज लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. दुसरीकडे, प्रामाणिकपणे कर भरणारे आणि नियमांचे पालन करणारे व्यवसायिक मात्र किरकोळ त्रुटींसाठीही अधिकाऱ्यांच्या कचाट्यात अडकवले जातात."शहराच्या मध्यवर्ती भागात, चांदणी चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी 'डायमंड परमिट रूम'चा हा उघड बेकायदा प्रकार सुरू आहे. जर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हा 'डायमंड' चमकताना दिसत नसेल, तर मग हे अधिकारी नक्की कोणाचे खिसे भरण्यासाठी काम करत आहेत? जर 'डायमंड परमिट रूम'वर तात्काळ कडक कारवाई झाली नाही आणि त्या सूत्रधार 'प्रवीण अण्णा'चा बुरखा फाडला नाही, तर सांगली जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल!"
— संतप्त नागरिक व व्यावसायिक
आता या संपूर्ण रॅकेटवर सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात? की 'प्रवीण अण्णा'च्या आर्थिक वजनाखाली दबून 'डायमंड' आणि 'सुरेश'ला पाठीशी घालतात? याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.